आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकस्मात आग लागली:कन्नड घाटात कंटेनरला आग; १२ तास वाहतूक विस्कळीत; जीवितहानी टळली महामार्ग पाेलिसांनी दाखवली तत्परता

चाळीसगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध कंपन्यांचे कुरिअर पार्सल घेऊन औरंगाबादकडे जाणाऱ्या कंटेनरला मध्यरात्री अकस्मात आग लागली. या आगीत कंटेनरसह त्यातील टीव्ही, लॅपटाॅप, मोबाईल, औषधे, कपडे असा एकूण सुमारे ५० ते ६० लाख रूपयांचा ऐवज जळून खाक झाला. कंटेनरमध्ये झालेल्या शाॅर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या आगीमुळे जवळपास १२ तास कन्नड घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी तत्परतेने पाेहाेचून मदतकार्य करत अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटाेक्यात आणली. शनिवारी दुपारी आग विझवण्यात यश आल्यानंतर घाटातील वाहतूक सुरळीत सुरू झाली.

चाळीसगावकडून औरंगाबादच्या दिशेने पार्सल घेऊन जाणारा केए ०१ एएल ४१६१ या क्रमांकाचा कंटेनर कन्नड घाटात महादेव मंदिराजवळ शनिवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास पाेहाेचला असता कंटेनरच्या आतमध्ये अचानक आग लागली. कंटेनरमधून मागच्या बाजूने माेठ्या प्रमाणावर धूर निघत हाेता. चालकाच्या लक्षात ही बाब येताच त्याने कंटेनर एका बाजूला घेत उभा केला व कंटेनरच्या बाहेर पडला. दरम्यान कंटेनरला आग लागल्याची माहिती कळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीमुळे घाटातून जाणारे अन्य वाहन चालकही भयभीत झाले हाेते.

त्यामुळे काही वेळ घाटातील वाहतूक विस्कळीत झाली. पोलिस हवालदार वीरेंद्रसिंग सिसोदे, योगेश बेलदार, प्रताप पाटील, सुनील पाटील, अमीर तडवी, दिवाकर जोशी आदी पोलिसांनी चाळीसगाव पालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करून आग विझवण्यासाठी मदतकार्य हाती घेत घाटातून एकेरी मार्गाने वाहतूक सुरू केली. कंटेनरला शनिवारी पहाटे लागलेली आग दुपारी २ वाजता विझवण्यात यश आले. दरम्यान या आगीत कंटेनरसह आतमधील विविध कंपन्यांचे पार्सल जळाले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कंटेनरच्या मागील बाजूसह चाकेही भस्मसात झाली. महामार्ग पाेलिसांनी क्रेनला पाचारण करून कंटेनर चाळीसगावच्या दिशेने पुन्हा घाटाखाली उतरवण्यात आला. त्यानंतर घाटातील रात्रीपासून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश मिळाले.

किमती ऐवज जळाल्याने विविध कंपन्यांना फटका
या कंटेनरमध्ये एलएडी टीव्ही, लॅपटॅाप, माेबाइल यासह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तु, कपडे, औषधी असा सुमारे ५० ते ६० लाख रूपयांचा विविध कंपन्यांचा किंमती ऐवज होता. हा सर्व मुद्देमाल कंटेनरला लागलेल्या आगीत जळून खाक झाला. वेळीच आग लागल्याचे लक्ष्यात आल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहीती एपीआय सतीश पाटील यांनी िदली.

बातम्या आणखी आहेत...