आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुकशुकाट:धरणगावात आज शिथिल हाेणार संचारबंदी; गुरुवारी बाजार हाेता बंद

धरणगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गायरानसाठी राखीव असणाऱ्या जागेवरील वादग्रस्त अतिक्रमण काढल्यानंतर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने ३२ तासाची संचारबंदी लावलेली आहे. दिवसभर सर्व व्यापाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकान बंद केली होती. तसेच गुरुवारी भरणारा आठवडे बाजार ही बंद केल्याने शहरात दिवसभर शुकशुकाट दिसून आला.

शहरातील संचारबंदीची ग्रामीण भागातील नागरिकांना मात्र माहिती नसल्याने बाजाराच्या उद्देशाने धरणगावात आलेल्या नागरिकांना शहराच्या बाहेरुनच परतावे लागल्याने त्यांचा हिरमोड झाला. दरम्यान, वादग्रस्त अतिक्रमण काढल्यानंतर पोलिस प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. तर गोपनीय पथकाचे पोलिस कर्मचारी सोशल मीडियासह व्हाॅट्सअॅपवर पोस्ट करणे, स्टेटस ठेवणे तसेच अक्षेपार्ह मेसेज करणे या संदर्भात कटाक्षाने लक्ष ठेवून आहेत. शहरात दोन दंगा नियंत्रक पथकातील ५० पोलिस कर्मचारी, १० पोलिस अधिकारी यांना तैनात करण्यात आले आहे.

दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नसून पोलिस शहरात फिरून नागरिकांना शांततेचे आवाहन करत होते. दरम्यान, गुरुवारी अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांनी धरणगाव पोलिस ठाण्यात भेट देऊन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. याविषयी ‘दिव्य मराठी’ने विचारले असता रमेश चाेपडे म्हणाले की, शहरातील सर्व परिस्थितीवर आमचे लक्ष आहे. शहरातील परिस्थितीचा नियमितपणे आढावा घेत असून नागरिकांना शांततेचे आवाहन केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कठाेर कारवाई करण्याचे संकेत पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...