आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्याचबरोबर भूजल पातळीत अचानक घट झाल्याने हाता-तोंडाशी आलेली उभी पिके सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. आधीच कृषी मालाला नसल्याने भावाबरोबरच हातचे वाया जाणारे पीक पाहून शेतकरी कासावीस झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक धरणांचा तालुका म्हणून जामनेरची नोंद आहे. साहजिकच उपलब्ध पाणीसाठा पाहता तालुक्यात रब्बी हंगाम ही मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. त्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस पाहता अनेकांनी रब्बीच्या पिकांची पेरणी केलेली आहे.
मात्र, वातावरणातील होणारे बदल, काही दिवसांपासून तापमानात झालेली प्रचंड वाढ पाहता जल-पातळीत अचानक घट झाली आहे. लागवड केलेल्या पिकांना देण्यासाठी पाणी पुरत नसल्याने शेतकऱ्यांवर उभी पिके सोडून देण्याची वेळ आली आहे. थोड्या दिवसांसाठी लागणारे पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याचे चित्र असल्याने शेतकरी हवालदिल झाला अाहे.
तालुक्यात सर्वाधिक बागायती क्षेत्र
जामनेर तालुक्यात ४९ धरणे आहेत. त्यामुळे हा पुरेसा पाणीसाठा रब्बीसाठी ताे फायदेशीर ठरताे. १ लाख ६ हजार हेक्टर पेरणी लायक क्षेत्र असून तब्बल ३० ते ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीचे पीक घेतले जाते. यंदाही सुमारे ३० हजार हेक्टर बागायती क्षेत्र असून अचानक जल-पातळी घटल्याने उभी पिके धोक्यात आली.
आठ दिवसांत घटली पाणीपातळी ...
या वर्षी झालेला दमदार पाऊस पाहता बहुतांश विहिरीचा पाणीसाठा बऱ्यापैकी वाढला होता. मात्र, गेल्या ८ दिवसात अचानक विहिरींची जल-पातळी घटली. ७ ते ८ तास पाणी पुरवू शकणाऱ्या विहिरी अवघ्या २ ते अडीच तासांवर येऊन थांबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला अर्धवट पीक सोडून देण्याची वेळ आली आहे.
पाण्याचा अपव्यय करणे पडले महाग
विहिरीत असलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने शेतकऱ्यांनी रब्बी पिकांबरोबरच कपाशीला सुद्धा फरदड घेण्याच्या दृष्टीने पाणी दिले. वास्तविक फरदड निर्मूलन होणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नाही. शेतकऱ्यांनी फरदड कापूस घेण्यासाठी कपाशीला मोठ्या प्रमाणात पाणी दिले. त्याचा विपरित परिणाम होऊन उपसा वाढल्याने जल-पातळी घटली. अशाच कारणांमुळे शेतकऱ्यांवर पश्चातापाची वेळ आल्याच्या भावना काही कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केल्या.
निम्मे पीक सोडले
पावसाळा जास्त झाल्याने विहिरीला भरपूर पाणी राहिल, असा अंदाज होता. त्यामुळे १२ एकरात रब्बीच्या पिकांची पेरणी केली हाेती. यात गहू, मका, ज्वारी या पिकांची लागवड केलेली होती. मात्र, गेल्या आठ ते दहा दिवसात अचानक जल पातळी घटल्याने निम्म्यापेक्षा जास्त पिके सोडून देत उर्वरित पिके वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. - भागवत वाणी, शेतकरी, फत्तेपूर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.