आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निपुण भारत अभियान:डाएटचे पथक तपासणार विद्यार्थ्यांची गुणवत्ता ; विद्यार्थी मागे असल्यामुळे उपाययोजनांना गती

चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निपुण भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची सप्टेंबरमध्ये अध्ययनस्तर चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत अनेक धक्कादायक तथ्ये समोर आली. चाचणीत इयत्ता पाचवीतील अनेक विद्यार्थ्यांना वाचता येत नसल्याचे समाेर आले. त्यामुळे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेतर्फे (डायट) तीन पथकांद्वारे जिल्हाभरातील पालिका, खासगी प्राथ.,माध्य., जि.प. शाळांमध्ये गुणवत्ता तपासली जात आहे.

निपुण भारत ही चाचणी शिक्षण विभागाने घेतली असून, त्याचा निकालही जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषदेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून सप्टेंबरमध्ये निपुण भारत अभियानांतर्गत चाचणी घेण्यात घेण्यात आली. यामध्ये तीनही विषयांचे पाच स्तर तयार करण्यात आले. या स्तरानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले. तिसरी, चौथी आणि पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना किमान शब्द ओळख, वाचन, लिखाण येणे गरजेचे आहे. मात्र, मुल्यमापनापेक्षा कितीतरी कमी पटीने विद्यार्थी गुणवत्तेत मागे असल्याचे निकालातून दिसून आले.

मातृभाषेत विद्यार्थी मागे घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये मातृभाषा मराठीतही विद्यार्थी मागे असल्याचे दिसून येते. यामध्ये ११.८ टक्के विद्यार्थ्यांना साध्या अक्षरांची ओळख नाही, तर २२.८ टक्के विद्यार्थ्यांना गोष्ट वाचता येते. २१.९ टक्के विद्यार्थी केवळ शब्दच वाचता येतात. २२.२ टक्के विद्यार्थ्यांना अक्षराची ओळख आहे.

शिक्षकांमध्ये व्यक्त होतोय नाराजीचा सूर गुणवत्ता वाढीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र, अनेकवेळा चुकीच्या पद्धतीने कार्यक्रम आखले जात असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. ही चाचणी घेताना पहिला आणि दुसरा वर्ग वगळून चाचणी घेणे अपेक्षित होते. जुलैमध्ये शाळा सुरू झाली असताना सप्टेंबरमध्ये चाचणी घेण्याची घाई प्रशासनाने केल्याने गुणवत्ता ढासळल्याचे काही शिक्षकांचे म्हणणे आहे.

तपासणीत काय पाहणार... निपुण भारत चाचणी तपासणी दौऱ्यात किती विद्यार्थ्यांचे पेपर घेतले, घेतलेले पेपर तपासले का?, पेपर तपासून बरोबर रिमार्क दिलेला आहे का?, तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतः पेपर लिहलेले आहेत का?, किती विद्यार्थ्यांना वाचता व लिहता येते?, किती विद्यार्थ्यांना संख्याज्ञान आहे. दिलेले चित्र ओळखता येते का?, गणिती संकल्पना कळतात का? आदी मुद्दे तपासले जात आहेत.

तपासणीचे वेळापत्रक असे जिल्ह्यात तालुकानिहाय ५ ते २४ डिसेंबर या काळात तीन पथकांद्वारे शाळांमध्ये तपासणी केली जात आहे. त्यात ५ ते १० डिसेंबर या काळात अमळनेर, मुक्ताईनगर, जामनेर, भडगाव, पारोळा, दि. १२ ते १७ या काळात एरंडोल, बोदवड, धरणगाव, यावल, चाळीसगाव आणि दि.१९ ते २४ या काळात चोपडा, जळगाव, रावेर, भुसावळ, पाचोरा या तालुक्यांमध्ये तपासणी होईल.

बातम्या आणखी आहेत...