आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठकीत दिली माहिती:गावठाण जागांचे 17 मे पासून ड्रोनद्वारे सर्वेक्षण, अमळनेर तालुक्यात केले जाणार सर्वेक्षण; डिजिटल नकाशे उपलब्ध होणार

अमळनेरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमळनेर तालुक्यात केले जाणार सर्वेक्षण; डिजिटल नकाशे उपलब्ध होणार

महसूल, भूमी अभिलेख आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडून गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत ड्रोनद्वारे तालुक्यातील गावठाणांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. १७ मे पासून सुरू करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणात १३३ गावांची तपासणी करण्यात येणार आहे.

येथील जी. एस. हायस्कूलमधील लायन्स क्लबच्या सभागृहात गुरुवारी महसूल, भूमी अभिलेख आणि ग्रामविकास विभागाची बैठक झाली. या बैठकीत गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत ड्रोनद्वारे तालुक्यातील गावठाणांचे सर्वेक्षण करण्याचे ठरवण्यात आले. पहिल्या टप्प्यात अमळनेर तालुक्याची निवड करण्यात आली आहे. प्रांत अधिकारी सीमा हिरे व तहसीलदार मिलिंद वाघ, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बी. सी. अहिरे, आशिष गिरी, कमलेश जोशी व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व तलाठी, सरपंच, उपसरपंच यांच्या उपस्थितीत ड्रोन सर्वेक्षणाची माहिती देण्यात आली.

तसेच गावाच्या सीमा, गावाचे रस्ते व सीमा चुना टाकून सर्वेक्षण केले जाईल, असे सांगितले. दरम्यान, ड्रोनद्वारे होणाऱ्या या मोजणीमुळे ग्रामपंचायतींच्या हद्दींचे नकाशे उपलब्ध होणार आहेत. तर जमीन मोजणीची प्रक्रिया सोपी होऊन नागरिकांना मालमत्तांच्या मालकी हक्कांचे प्रमाणपत्र मिळू शकेल. राज्यातील बहुतांश गावठाणांचे अभिलेख नसल्याने जमिनींचे व्यवहार करताना अडचणी येतात तसेच वादही होतात. आता ड्रोनच्या माध्यमातून मालमत्तांची मोजणी केल्याने मालमत्तेवरून होणारे वाद मिटतील. तसेच गावातील नागरिकांना मालमत्तांच्या मालकी हक्कांचे प्रमाणपत्र मिळेल.