आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपने वाढवलेली मते व नात्यागोत्यांच्या यशस्वी खेळीमुळे जामनेर तालुका शेतकरी सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजपच्या या चाणक्य नितीमुळे जामनेरात महाविकास आघाडी पूर्ती गर्भगळीत झाली असून नेत्यांसह उमेदवारांनी निवडणूक लढण्याआधीच हार मान्य केली आहे.
काँग्रेमधील काही नाराजांसह माजी आमदार ईश्वरलाल जैन यांच्या सहकार्याने २०१६मध्ये जामनेर भाजपने शेतकी संघाची सत्ता काबीज केली हाेती. पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला असला तरी कोरोना व राजकीय अस्थिरतेमुळे त्यांना दोन वर्षांचा अतिरिक्त कालावधी मिळाला. या सात वर्षांच्या कालावधीत जामनेर भाजपने व्यक्तीसह मतदार संघात तब्बल ७०० मते वाढवली.
तसेच तालुक्यातील ९२ पैकी तब्बल ६५ विकासो ताब्यात घेतल्या आहेत. वाढीव मतांबरोबरच महा-विकास आघाडीतील संभाव्य उमेदवारांच्या नात्यागोत्यातील वरचढ उमेदवार देत चाणक्य नीती अवलंबली.
असे आहेत विजयी उमेदवार ...
चंद्रकांत बाविस्कर, बाबुराव गवळी, डॉ. सुरेश पाटील, रंगनाथ पाटील, साहेबराव देशमुख, दगडू चौधरी, रजनी नाईक, किशोर पवार, सुरेखा पाटील, उत्तम राठोड, भिकारी जाधव, गिरीश पाटील, आबा पाटील, युवराज शेळके, संगीता पाटील, नाना पाटील हे बिनविरोध झाले त. सर्व बिनविरोध सदस्यांचा माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांनी सत्कार केला.
नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विकास साेसायट्यांच्या मतांमुळे भाजपला १०० टक्के यश मिळवता आले आहे. वाढीव मतदार व सहकारी सोसायटीमध्ये पडती बाजू पाहता महा-विकास आघाडीतर्फे मंगळवारी संयुक्त बैठक घेण्यात अाली. यात सर्व उमेदवारांच्या माघारीचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार गुरुवारी महा-विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी माघारी घेतल्या. त्याचबरोबर मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांव्यतिरिक्त भाजपतील इच्छुकांनी ही माघारी घेतल्याने जामनेर तालुका शेतकरी सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.
भाजपची घोडदौड
सन १९९३ साली गिरीश महाजन हे प्रथम आमदार झाले. त्यानंतर तब्बल तीन पंचवार्षिक निवडणूक जिंकल्यानंतर ही गिरीश महाजन यांना सहकार क्षेत्रात हवी तेवढी ताकद निर्माण करता आली नव्हती. दरम्यान, सत्ता संघर्षाच्या खेळात काँग्रेसमधील नाराज असलेल्या सहकारातील पदाधिकाऱ्यांना मंत्री महाजन यांनी जवळ केले. तसेच तालुक्यात संजय गरुड यांचे कट्टर विरोधक म्हणून माजी आमदार ईश्वरलाल जैन यांचेही मंत्री गिरीश महाजन यांना सहकार्य मिळाले. आज सहा पंचवार्षिक निवडणुका जिंकण्याबरोबरच सहकारातील कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकी संघ, देखरेख संघ अशा मोठ्या संस्थाही मंत्री महाजन यांनी काबीज केल्या आहेत.
मंत्री महाजन यांच्या या घोडदौडीमुळे तालुक्यातील शेंदुर्णीतील काही संस्था वगळता अन्य मोठ्या सहकारी संस्था भाजपच्या ताब्यात आल्या आहेत.
माघारीच्या शेवटच्या दिवशी संस्था मतदार संघातून एकूण ७ जण बिनविरोध तर महिला राखीवमधून २ तसेच भटक्या विमुक्त जाती मतदारसंघातून १ अशा एकूण १० जागा बिनविरोध झाल्या अाहेत. निवडणूक अधिकारी म्हणून एस. एफ. गायकवाड, संजय पाटील, शेतकरी संघाचे मॅनेजर राहुल पाटील, भिका पाटील, बाबूलाल शिंपी, अमोल पाटील यांनी काम पाहिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.