आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरमून:पृथ्वीजवळ आल्याने आज पौर्णिमेचा चंद्र 14 टक्के दिसणार मोठा, दोन दिवस संधी

चाळीसगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी असलेल्या वटपौर्णिमेला चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर तब्बल २७,५०० किलोमीटरने कमी होणार आहे. पृथ्वीजवळ आल्याने मंगळवारी आकाशात ‘सुपरमून’ दिसेल. मंगळवार आणि बुधवार अशा दोन्ही दिवशी आकाशात तो बघता येईल. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर हे ३ लाख ८४ हजार ४०० किलोमीटर एवढे आहे. वटपौर्णिमेला हे अंतर २७,९०० किलोमीटरने कमी होऊन ३ लाख ५६ हजार ५०० किमीवर येणार आहे. चंद्र पृथ्वीजवळ येणार असल्याने त्याचा आकार १४ टक्के मोठा दिसेल. नेहमीपेक्षा चंद्र ३० टक्के अधिक प्रकाशित दिसेल. त्याला खगोलशास्त्रात ‘सुपरमून’ म्हटले जाते. विशेषत: चंद्रोदय होताना दिसणारा ‘सुपरमून’ डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. क्षितिजाजवळ त्याचा आकार, रंग आणि प्रकाश पाहणे हे खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी असते. जिल्हाभरातील खगोलप्रेमींनी सुपरमून पाहण्याची संधी साधण्यासाठी तयारी केली आहे. अनेक ठिकाणी भूगोल अभ्यासक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सुपरमूनच्या दुर्मिक स्थितीची माहिती देणार आहेत.

खगोलप्रेमींनी संधी चुकवू नये ^सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी चंद्रोदयावेळी ‘सुपरमून’ बघता आला नाही तर रात्रभरात केव्हाही बघता येईल. बुधवारीदेखील आकाशात ‘सुपरमून’ दिसेल. खगोलप्रेमींसाठी ही आनंद पर्वणीच म्हणावी लागेल. - अमोघ जोशी, खगोल अभ्यासक

ढगाळ वातावरणाची चिंता पण... १४ जून रोजी आकाशात सायंकाळी ७.१६ वाजता चंद्रोदय होईल. या वेळी क्षितिजाजवळ चंद्र विलक्षण मोठा आणि प्रकाशमान दिसणार आहे. या वेळेत आकाशात वातावरण ढगाळ असल्यास उत्साहावर पाणी फिरू शकते; परंतु पहाटे ६.१५ वाजेपर्यंत ही संधी राहणार आहे. इतकेच नव्हे तर दुसऱ्या दिवशी १५ जून रोजी रात्री ८.२५ वाजेनंतर पुन्हा सुपरमून पाहता येईल.

बातम्या आणखी आहेत...