आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपात चाळीसगाव विभागातील तांत्रिक, क्लर्क, ऑपरेटर, अभियंता असे सुमारे ३०० कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे सकाळपासून शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा योजनांसह शेती पंपांचे फिडरही बंद पडले होते. संपकरी कर्मचाऱ्यांनी हिरापूर रेाडवरील सबस्टेशन समोर आंदोलन केेले. संपामुळे राज्यात वीज निर्मितीवर परिणाम झाला. चाळीसगाव परीसरातही त्याचा फटका बसल्याचा दावा संपकरी कर्मचाऱ्यांनी केला होता. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी हिरापूर रोडवरील सब स्टेशनसमोर एकत्र येत आंदोलन पुकारले. महावितरण खासगीकरणाच्या विरोधात तसेच केंद्र व राज्य सरकार आणि अदानी समुहाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. संपामुळे महावितरणच्या चाळीसगाव विभागातील कार्यालयांमध्ये सकाळपासून शुकशुकाट होता.
अमळनेरात संपाच्या काळात वीज सुरळीत अमळनेर | खासगीकरणाला विरोध म्हणून महावितरण कंपणीचे कर्मचारी मंगळवारी संपावर गेले होते. कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी मंगळवारी आंदोलन केले. कृती समितीचे कामगार नेते पी.वाय. पाटील, मनोज पवार, प्रफुल्ल पाटील, रवींद्र सुर्यवंशी, श्यामकांत पाटील, जगदीश वंजारी यांनी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. वीज कर्मचारी संपावर गेल्याचा परिणाम कुठेही झाला नाही. मंगळवारी दिवसभर वीजपुरवठा सुरळीत होता. सायंकाळी संप मागे घेण्यात आला.
पारोळ्यात १०४ कर्मचाऱ्यांचा सहभाग पारोळा | तालुक्यात महावितरणच्या १०४ कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला. त्यापैकी २५ कर्मचारी पाचोरा येथे व २५ कर्मचारी जळगाव येथे संपामध्ये सहभाग घेण्यासाठी गेले. तर कंत्राटी २७ कर्मचाऱ्यांनी कामकाज सांभाळले. शहरात मंगळवारी दिवसातून दोन ते तीन वेळा वीजपुरवठा खंडीत झाला. परंतु लागलीच पुरवठा सुरळीत झाला. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत होता. १३३ केव्ही केंद्रावर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. पोलिसांनी आढावा घेतला.
पाचोऱ्यात संपाचा कोणताही परिणाम नाही पाचोरा |संपाच्या अनुषंगाने वीज कर्मचाऱ्यांनी पाचोरा महावितरण विभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. संपाला कॉँग्रेसचे सचिन सोमवंशी, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे अभय पाटील तसेच विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. याप्रसंगी संघर्ष समितीचे आर.आर.पाटील, किशोर पाटील, दीपक आदीवाल, शरद मोरे आदी उपस्थित होते. या संपाचा वीजपुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नाही.
धरणगावात आंदोलन धरणगाव | येथील विभागीय कार्यालयाबाहेर महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी संयुक्त कृती समितीने आंदोलन केले. भिका पाटील, मनोज देवराळे, कमलेश चौधरी, भानुदास विसावे, संतोष सोनवणी, विठ्ठल पवार, हेमंत कुलकर्णी, धीरज महाजन, दत्तू पवार, दीपक अहिरे, मनोज मराठे, किशोर महाजन, रवींद्र चिचोरे, वैभव वानखेडे आदी कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.