आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाऊसबाेट:केरळ, काश्मीर नव्हे वाघूरवर घ्या हाऊस बाेट टुरिझमचा आनंद

प्रदीप राजपूत | जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समुद्र किनाऱ्यावर फिरणाऱ्या आलिशान हाऊसबाेट, बेटावर साकारलेल्या टुमदार हाॅटेलचा आनंद घेण्यासाठी आता केरळ, काश्मीरला जाण्याची गरज नाही. जळगावपासून जवळच वाघूर धरणाच्या बॅकवाॅटरमध्ये हा आनंद घेता येणार आहे. मुंबई वगळता महाराष्ट्रातील पहिले हाऊसबाेट पर्यटन जळगावात उपलब्ध झाले आहे. थ्री बीएचकेची व्यवस्था असलेले हाऊसबाेट साेबतच बेटावरील व्हिला, रेस्टाॅरंट लवकरच पर्यटकांसाठी खुले हाेणार आहे. वाघूर धरणावरील पर्यटन विकासासाठी शासनाकडून २२ काेटी रुपये उपलब्ध झाले आहेत. बीआेटी तत्त्वावर धरणातील बेट विकसित केले जात आहे. तळमजल्यावर थ्री बीएचके आणि पहिल्या मजल्यावरील एका हाॅलसह तीन हाऊस बाेट असणार आहेत. पहिली बाेट सुरू झाली आहे.

येथे साकारतंय बेटावरचे पर्यटन
जामनेर-भुसावळ रस्त्यावर गारखेडा गावापासून पश्चिमेला डाेहरी तांडा गावाजवळ वाघूरचे बॅकवाटर आहे. यात एक २० ते २५ एकरचे बेट आहे. येथे बांबू हट तयार केल्या जात आहे. बांबूपासून बनवलेले प्रशस्त खुले रेस्टाॅरंट, बांबूच्या नऊ एसी हट उभारल्या आहेत. बांबू कामासाठी गुजराती कारागीर आहेत. काेकणातील जांभा दगडापासून फाेर बीएचकेच्या तीन व्हिला साकारत आहेत.

केरळच्या कंपनीकडून बाेटची बांधणी : केरळ येथील इनलॅड मरिन या कंपनीकडून एक प्रशस्त हाऊसबाेट तयार करण्यात आली आहे. ही बाेट सध्या धरण क्षेत्रात फिरत आहे. तर आणखी दाेन बाेटींचे काम धरणाच्या किनाऱ्यावर सुरू आहे. यासाठी केरळातील काेचीन, पश्चिम बंगालच्या काेलकाता येथून कारागीर आले आहेत. बाेटचे वजन ४५ टन असून, ३० टनापर्यंत स्टीलचा वापर करण्यात आला असून, उर्वरित लाकूड आणि बांबूचे काम आहे.

शासनाकडून १२ काेटींचा निधी : वाघूर धरणातील बेटावर पर्यटन विकसित करण्यासाठी एकूण २२ काेटी रुपयांच्या निधीची कामे केली जात आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून यावर काम सुरू झाले असून, हाऊस बाेटींच्या पर्यटन, बेटावरील रेस्टाॅरंट आणि अन्य पर्यटन विकसित करण्यासाठी शासनाकडून आणखी निधी मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात पर्यटन क्षेत्रात जळगावचे नाव राज्यात आणखी अधोरेखित होणार आहे.

तीन प्रशस्त, आलिशान हाऊस बाेट : वाघूर धरणाच्या बॅकवाॅटरमध्ये तीन प्रशस्त बाेट थांबणार आहेत. एका बाेटीचे वजन जवळपास ४५ टन एवढे आहे. त्यात तळमजल्यावर तीन बेडरूम, एक छाेटा हाॅल आणि किचन आहे. प्रत्येक बेडरूमला बाथरूम अटॅच आहे. पहिल्या मजल्यावर तब्बल १०० फूट बाय १५ फुटाचा भव्य हाॅल आहे. या बाेटवर पार्टीसाठी एकाच वेळी दीडशे लाेक राहू शकतात, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...