आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीसगावकरांचा प्रवास सुखद:दिवाळीनंतर परतीच्या प्रवाशांसाठी 13 नोव्हेंबरपर्यंत जादा बससेवा

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळी तरीही परतीचा प्रवास करणाऱ्यांची गर्दी जैसे थे असल्याने, प्रवाशांच्या सुविधेसाठी नाशिक, पुणे, अमरावती, सोलापूर व सुरत या लांब पल्ल्याच्या जादा बसेस, १३ नाेव्हेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय चाळीसगाव आगाराने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना गर्दीच्या काळात सुविधा मिळणार आहे.ऐन दिवाळीत लक्झरी बसगाड्यांची भाडेवाढ झाली होती. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची मदार लालपरीवर अवलंबून होती. त्यातही अनेक प्रवाशांनी दिवाळीत इच्छितस्थळी जाण्यासाठी बसच्या आरक्षण सुविधेचा आधार घेतला होता.

प्रवाशांचा हा प्रतिसाद पाहता महामंडळानेदेखील गैरसाेय टाळण्यासाठी जादा बसेस सुरू केल्या. नाशिक, पुणे, सुरत, शिर्डी, औरंगाबाद, सोलापूर, अमरावती, पंढरपूर, अकोला, शेगाव, अहमदाबाद, अक्कलकोट या मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या. दरम्यान, दिवाळी संपून आठवडा झाला तरीही लालपरीची गर्दी कायम आहे. त्यामुळे नाशिक, पुणे, अमरावती, सोलापूर व सुरत या लांब पल्ल्याच्या जादा बसेस १३ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. पुणे मार्गावर ऑनलाइन बुकिंग सुविधा ही एसटीच्या अॅपवरून प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा बस प्रवासी लाभ घेत आहेत.

या मार्गावर जादा बसेस
नाशिक, सोलापूर, अमरावती, पंढरपूर, सुरत, पुणे, अकोला, शेगाव, अहमदाबाद, अक्कलकोट या मार्गावर, दिवाळीनंतर परतीच्या प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या बसेस सुरू आहेत. दिवाळीत सुरू केलेल्या जादा बसेस १३ नाेव्हेंबरपर्यंत धावतील. मात्र, १४ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील फेऱ्यांना प्राधान्य देत, जादा बसेस १३ नोव्हेंबरपासून बंद करण्यात येतील. नियमित लांब पल्ल्याच्या बसेस पूर्वीच्या वेळापत्रकानुसार धावणार आहेत.

कोरोनाची भर काढली | चाळीसगाव आगाराच्या बसेस दिवाळीच्या काळात ३ लाख ८३० किलोमीटर धावल्या. या माध्यमातून आगाराला एक कोटी ७४ हजार ९०८ रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत कोरोनाच्या काळानंतर प्रथमच चाळीसगाव आगाराच्या उत्पन्नात इतकी मोठी भर पडली.

दोन लाख प्रवाशांनी घेतला सेवेचा लाभ
दिवाळीत २१ ते ३१ आॅक्टोबर या ११ दिवसांत चाळीसगाव आगारात ६१ बसेसद्वारे २ लाख १६ हजार ८९२ प्रवाशांनी प्रवास केला. यामध्ये ७५ वर्षे वयाच्या १८ हजार ९२८ प्रवाशांनी प्रवाशांनी अमृत योजनेचा लाभ घेतला. यामुळे आगाराला ११ दिवसांतच एक कोटी ७४ हजार ९०८ रुपयांचे उत्पन्न मिळाले. दिवाळीच्या काळातील उत्पन्नात चाळीसगाव आगाराने नाशिक परिवहन विभागात दुसरा क्रमांक मिळवला आहे, अशी माहिती चाळीसगावचे आगारप्रमुख संदीप निकम यांनी दिली.

सर्वांच्या मेहनतीमुळे विक्रमी उत्पन्न
यापुढेही प्रवाशांच्या सोयीसाठी चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू. विक्रमी उत्पन्नाचे श्रेय कर्मचाऱ्यांचे आहे. दिवाळीच्या काळात कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतल्याने आगाराच्या उत्पन्नात भर पडली. आगारातील सर्व कर्मचारी, चालक, वाहक, मॅकेनिक यांच्यामुळे हे शक्य झाले. - संदीप निकम, आगारप्रमुख, चाळीसगाव

बातम्या आणखी आहेत...