आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपत्ती:भीती वाढली; पाचोरा तालुक्यात चार ठिकाणी कोसळली वीज; जिवितहानी नाही, आंबेवडगावात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे नुकसान

पाचोरा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, या तीन दिवसात तालुक्यात चार ठिकाणी वीज काेसळली आहे. परंतु, सुदैवाने याच जीवित हानी झाली नसून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पाचाेरा तालुक्यातील निंभोरी बुद्रुक, सारोळा बुद्रुक, आंबेवडगाव व नांद्रा येथे गेल्या तीन दिवसात वीज कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यात आंबेवडगाव येथील दिलीप जैन यांच्या घरावर वीज काेसळल्याने छतावरील पाण्याच्या टाकिला मोठे तडे पडले आहेत. तर घरातील फ्रिज, इनर्व्हटर, फॅन, लाईट फिटिंग व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे सॉफ्टवेअर जळून खाक झाले.

यामुळे दिलीप जैन यांचे जवळपास ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. निंभोरी बुद्रुक येथील एकनाथ चंदणे यांच्या घराजवळील लिंबाच्या झाडावर शुक्रवारी रात्री ८ वाजता वीज कोसळल्याने झाड जळून खाक झाले आहे. तर शनिवारी सायंकाळी ५ वाजता सारोळा बुद्रुक येथील गावाच्या उत्तरेला असलेल्या नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने ५० टक्के झाड जळून खाक झाले आहे. तर येथून थाेड्याच अंतरावर एक महिला भांडी घासत हाेती. परंतु, नशिब बलवत्तर असल्याने त्यांना काेणतीही इजा झाली नाही.

पावसातही झाडाने घेतला पेट : रविवारी नांद्रा येथे मेघगर्जनेसह पावसाने तुरळक हजेरी लावली. तर पाचोरा शहरासह तालुक्यात ही शनिवारी रात्रीच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान, शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास नांद्रा येथील डॉ. दीपक सूर्यवंशी यांच्या (गट नं.१५९) पाटचारी जवळ असलेल्या लिंबाच्या झाडावर वीज काेसळली. त्यामुळे या झाडाने भर पावसात ही पेट घेतला. सुदैवाने रात्र असून तेथे कुणीच नसल्याने अनर्थ टळला.

कडुनिंबाच्या झाडावर कोसळली वीज
रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास लोहारा (ता.पाचोरा) परिसरात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. या वेळी लोहारा-पाचोरा रस्त्यालगत भगवान खरे यांच्या गट नंबर २७ मधील शेतात कडूनिंबाच्या झाडावर वीज कोसळली. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही.

हिरापूर शिवारात पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान
पारोळा | शहरासह तालुक्यात १० राेजी रात्री विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाने झोडपून काढले. धाबे, शेळावे, मोहाडी व हिरापूर भागात वीज काेसळली. तर, हिरापूरचे शेतकरी निंबा काळू पाटील यांच्या शेतात लिंबाच्या झाडावर वीज काेसळली. यात शेतातील कापसाच्या झाडांना झडप बसली.

वटवाघळांचा निंब म्हणून झाडाचा नावलौकिक : शंभर वर्षांहून अधिक काळापासून या लिंबाच्या झाडावर वटवाघूळ या पक्षांचे वास्तव आहे. त्यामुळे या निंबाच्या झाडाला वटवाघळांचा लिंब म्हणून ओळखले जाते. आता याच लिंबाच्या झाडावर वीज पडल्याने हे झाड जमीनदोस्त होणार असून त्याची जुनी ओळख मिटणार असल्याचे दुःख ग्रामस्थांनी बोलून दाखवले.

बातम्या आणखी आहेत...