आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सवाची तयारी:निर्बंधमुक्त गणेशोत्सवामुळे जोमाने साकारल्या जाताहेत गणेशमूर्ती

चाळीसगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे सलग दोन वर्षे गणेशोत्सवावर निर्बंध लादण्यात आले होते. त्याचा फटका मूर्तिकारांना बसला होता. मूर्तिकारांना व्यवसायात तब्बल ६० टक्के तूट सोसावी लागली होती. मात्र, यंदा गणपती मूर्तीच्या उंचीसह इतर निर्बंध हटवण्यात आल्याने येथील मूर्तिकारांवरील विघ्न टळले आहे. शहरातील मालेगाव रोड, नागद रोड परिसरात हजारो मूर्ती सध्या आकार घेत आहेत.

गतवर्षी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली हाेती. मात्र, याबाबतची नियमावली जाहीर होण्यास उशीर झाला होता. त्याचा फटका शहरातील मूर्तिकारांना बसला होता. मात्र, यंदा गणेशोत्सवाची नियमावली वेळेत जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मूर्तीच्या उंचीवरील मर्यादा काढून टाकली आहे. यामुळे गणेशोत्सवाला एक महिना वेळ असला तरीही सार्वजनिक मंडळांसोबत घरगुती गणेश मूर्ती घडवण्याची प्रक्रिया मूर्तिकारांकडून जाेमाने सुरू आहे. शहरातील मालेगाव रोड भागात संभाव्य मागणीनुसार घरगुती गणेशमूर्तींसह सार्वजनिक मंडळांसाठी आवश्यक असलेल्या जवळपास १० फूट उंची पर्यंतच्या मूर्ती आकार घेत आहेत. येथील कारखान्यात निर्मित मूर्तींना जळगाव, धुळे, औरंगाबाद आदी जिल्ह्यांतून दरवर्षी मोठी मागणी असते. सोबतच जिल्ह्यात चाळीसगाव येथील गणेश मूर्ती प्रसिद्ध आहेत.

त्यानुसार येथील मूर्तिकारांनी नियोजन करुन लाखो मूर्तीची निर्मिती येथे सुरू आहे. तर लहान आकाराच्या तयार गणेश मूर्तीवर रंगरंगोटीचे काम सुरू आहे. गणेशोत्सवाला आणखी ३६ दिवसांचा कालावधी असला तरी मोठ्या संख्येने मूर्ती बनवाव्या लागत असल्याने येथील कारखान्यातील मूर्तिकारांची लगबग वाढली आहे.

६५ मूर्तिकार दिवस- रात्र घेत आहेत मेहनत
शहरातील मूर्ती निर्मितीच्या कामात जवळपास ६५ मूर्तिकारांच्या दिवस-रात्र मेहनतीतून लाखो मूर्ती आकार घेत आहेत. सद्य:स्थितीत जवळपास एक लाख घरगुती गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. या मूर्तीवर आता रंगकाम करण्याचे काम सध्या सुरु आहे.

गणेशमूर्तिंचे दर वधारणार
सध्या सर्वच क्षेत्रात महागाई वाढल्याने यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईची किनार लाभणार आहे. प्रामुख्याने मूर्तीसाठी आवश्यक असलेले पीओपी व रंगांच्या किमतीत २० ते २५ टक्के दरवाढ झाली आहे. मूर्ती कारखान्यातील कामगारांच्या मेहनतान्यात ही वाढ झाल्याने यंदा गणेश मूर्तींच्या दरात किमान २० टक्के दरवाढ होण्याची शक्यता आहे.

बंधने हटवल्याने दिलासा
दोन वर्षात लाखोंचे नुकसान झाले. मात्र, राज्य सरकारने मूर्तीच्या उंचीवरील बंधने हटवल्याने दिलासा मिळाला आहे.
गणेश उतेकर, मूर्तिकार

बातम्या आणखी आहेत...