आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी घटना:एरंडोलमध्ये गॅस गिझरच्या गळतीने घेतला 16 वर्षीय विद्यार्थ्याचा बळी

एरंडोल8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंघोळ करताना गॅस गिझरच्या गळतीमुळे बाथरूममध्ये गुदमरून दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. रेणुका नगरमध्ये सोमवारी सकाळी १० वाजता ही दुर्दैवी घटना घडली. एरंडोल येथील रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयातील शिक्षक वासुदेव त्र्यंबक पाटील हे परिवारासह रेणुका नगरात वास्तव्यात आहेत. त्यांचा दहावीत शिकणाला मुलगा यश (साई) हा सकाळी १० वाजता अंघोळीसाठी गेला होता. बराच वेळ होऊनही तो बाहेर न आल्याने वासुदेव पाटील यांनी त्याला आवाज दिला. मात्र, आतून त्याने प्रतिसाद न दिल्यामुळे यशचे मामा दीपक पाटील यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला.

त्यावेळी यश हा बाथरूममध्ये खाली पडलेला होता. तसेच बाथरूममध्ये गॅस गळतीचा वास येत होता. वासुदेव पाटील व दीपक पाटील यांनी यशला कल्पना हॉस्पिटलमध्ये नेले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यास तपासून तो मृत झाल्याचे सांगितले. याबाबत दीपक पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून एरंडोल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली. हवालदार सुनील लोहार तपास करत आहेत.

बहीण असते पुण्याला यश हा शिक्षक वासुदेव पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, मोठी बहीण असा परिवार आहे. चार महिन्यापूर्वीच त्याची मोठी बहीण पुणे येथे नोकरीला लागली होती. तर यश दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पुण्याला जाणार होता. एरंडोल ग्रामीण रुग्णालयात डॉ. कैलास पाटील, डॉ. मुकेश चौधरी यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर रात्री ९ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण एरंडोल शहरात शोककळा पसरली होती.

१६ वर्षाआतील संघात बांगलादेशविरुद्ध शतक यश हा उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून एरंडोल शहरासह परिसरात परिचित होता. सायकल चालवणे, व्यायाम आणि क्रिकेटचा त्याला छंद होता. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा त्याचा आदर्श होता. पोदार इंटरनॅशनल स्कूलकडून १६ वर्षाखालील संघात तो अमरावती येथे बांगलादेशविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याने ११२ धावा काढल्या होत्या. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील व खडके येथील एम.डी. माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांचा तो पुतण्या होता.

बातम्या आणखी आहेत...