आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना दिलासा:गौराई पावली  मुगाला विक्रमी रु.8300 भाव

अमोल पाटील | अमळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारचा दिवस शेतकऱ्यांसाठी आनंददायी ठरला. अमळनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मुगाला विक्रमी ८ हजार ३०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला. गेल्या वर्षीपेक्षा दुप्पटीने भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. यंदा मूग व उडदाची उत्पादन कमी असल्याने सुरुवातीलाच विक्रमी भाव मिळाल्याचे बाजार समितीचे म्हणणे आहे. चांगल्या दर्जाच्या मुगाला यापेक्षा अधिक भाव मिळण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. शनिवारी गौराईचे आगमन झाले अन् शेतकऱ्यांच्या हातात लक्ष्मी आली, त्यामुळे ते आनंदले.

शेतकऱ्यांना रोख रक्कम मिळत असल्याने पसंती
जळगाव जिल्ह्यातील अमळनेरची बाजार समिती सर्वात मोठी आहे. या बाजार समितीत रोखीने व्यवहार होत असल्याने जळगाव जिल्ह्यासह धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, शिरपूर येथीलही शेतकरी बाजार समितीत माल आणतात. लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात पैसे दिले जातात तसेच मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी व्यापारी येत असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी या बाजार समितीत माल विक्रीसाठी आणतात.

गौराई घेऊन आली आनंदवार्ता
शनिवारी गौराईचे सर्वत्र आगमन झाले. याच दिवशी मुगाला विक्रमी भाव मिळाल्याने लक्ष्मी पावल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटली. हातात लक्ष्मी घेऊनच ते बाजार समितीतून घरी परतले. यंदा कृषी मालाला असाच विक्रमी भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

ही आहेत विक्रमी भाव मिळण्याची कारणे
यंदा मुगाचा पेरा शेतकऱ्यांनी केला मात्र कधी जास्त तर कधी कमी पाऊस त्यामुळे उत्पादन घटले आहे. अशीच स्थिती उडदाचीही आहे. त्यामुळे बाजार समितीत मुगाची आवक कमी असून उडदाची तर अगदीच नगण्य आहे. मागणी अधिक व पुरवठा कमी असल्याने साहजिकच मुगाला विक्रमी भाव मिळाला. गेल्या वर्षी चार हजार रुपये भाव मिळाला होता.

गतवर्षी ७०० तर यंदा १५० क्विंटल आवक : गेल्यावर्षी दररोज ५०० ते ७०० क्विंटल मुगाची आवक बाजार समितीत होत होती तर यंदा सध्या दररोज १५० क्विंटल आवक आहे. आठवडाभरापासून माल येत असून खरेदी सुरु आहे. उडदाची तर अगदीच नगण्य आवक आहे.

बातम्या आणखी आहेत...