आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शैक्षणिक ‘दीक्षा’ अ‍ॅपमध्ये व्याकरणाच्या चुका; क्यूआर कोड स्कॅन करताच पाठात आढळतात दोष, शब्दांचे उच्चारदेखील अशुद्ध

चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेतू अभ्यासाच्या चाचणीतही तिसरीचे परिसर अभ्यासाचे एकच पुस्तक पेपर मात्र दोन

शालेय विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या दीक्षा अॅपमध्ये व्याकरणाच्या अनेक चुका असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दीक्षा अॅप विकसित करणाऱ्यांनाच शुद्धलेखनाचे धडे देण्याची गरज दिसत आहे. मागील दीड वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण व्हावा या उद्देशाने पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना आजही ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात व्हिडीओ व झूम अॅप सारखे पर्याय वापरले आहेत. मात्र ग्रामीण भागात या शिक्षणाला नेटवर्कची समस्या मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यातही बहुतांश पालकांजवळ अँड्रॉइड मोबाईल नाही अशा स्थितीत मार्ग काढत विद्यार्थी कसेबसे अभ्यास करीत आहेत.

विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये राज्य पाठयपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळाने पुस्तकाच्या पहिल्या पानावर एक सूचना दिली आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, पाठच्या पहिल्या पानावर दिलेला क्यूआर कोड दीक्षा अँपद्वारे स्कॅन करून पाठासंबंधित उपयुक्त दृकश्राव्य व्हिडीओ उपलब्ध होतील, अशी सूचना आहे. मात्र विद्यार्थ्यांनी हा क्यूआर कोड दीक्षा अॅपवर स्कॅन केला असता त्या पाठातील व्याकरणाच्या दृष्टीने अनेक चुका यामध्ये दिसून येत आहेत. त्याचबरोबर ध्वनी व्यवस्थित ऐकू येत नाही. त्यामुळे या अॅपमधील सदोष शब्द विद्यार्थ्यांच्या अशुद्धच अंगवळणी पडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे अशा शब्दांचे चुकीचे उच्चार विद्यार्थी शिकत आहेत. त्यांच्या भाषाशैलीवरदेखील विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.

सेतू अभ्यासाच्या चाचणीतही तिसरीचे परिसर अभ्यासाचे एकच पुस्तक पेपर मात्र दोन
विद्यार्थ्यांची उजळणी पक्की व्हावी तसेच मागील वर्गाचे ज्ञान जागृत व्हावे यासाठी सेतू अभ्यास चाचणीचा ४५ दिवसांचा अभ्यासक्रम सुरू केला खरा मात्र विविध विषयांच्या पेपरमध्ये गुणांची तफावत आहे. तसेच इयत्ता तिसरीचे परिसर अभ्यासाचे एकच पुस्तक असताना चाचणी क्रमांक तीन च्या पेपरमध्ये परिसर अभ्यास १ व परिसर अभ्यास २ असे दोन पेपर दिल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये पुरता गोंधळ निर्माण झाला आहे. शिक्षक देखील संभ्रमात आहेत. त्यामुळे हा गोंधळ दूर करण्यासोबत, अॅपमधील तांत्रिक चुकांची आणि व्याकरणाची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी होत अाहे. दरम्यान, यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सध्या तरी आहे.

ऑनलाइन अभ्यासाला कंटाळले पालक व विद्यार्थी
दररोज दिल्या जाणारा ऑनलाइन अभ्यासाला पालक व विद्यार्थी कंटाळले आहेत. एकावेळी विद्यार्थ्यांना स्वाध्याय सोडवावा की सेतू पेपर सोडवावे, त्यातच नवीन पुस्तकांसाठी विद्यार्थ्यांना अद्यापही प्रतीक्षाच करावी लागत आहे.

अशा आहेत चुका
परिस्थिती ऐवजी परिसतीती , अन्नपदार्थ ऐवजी अन्पदार्थ, रोगजंतू ऐवजी रोगजन्तु, गॅस्ट्रो ऐवजी ग्यास्ट्रो ,किंवा ऐवजी किव्वा, बदललेला ऐवजी बद्दलेला, ब्रह्मपुत्र ऐवजी ब्रह्मपुत, असे शब्द वापरले आहेत. यापेक्षाही अधिक चूका आहेत. त्यामध्ये काना, मात्रा, विलांटी, अनुस्वार यांचा चुकीचा उल्लेख या अँपमध्ये करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...