आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप हंगाम:बियाणे मिळताच पहिल्या दिवशी चाळीसगाव तालुक्यात बागायती कापूस पेरणीस सुरुवात ; शेत शिवार तीव्र उन्हातही फुलले

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात शेतकऱ्यांना १ जूनपासून कृषी केंद्रांवर बियाणे उपलब्ध झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सकाळीच कृषी केंद्र गाठत बियाण्यांची खरेदी केली. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरीला मुबलक पाणी आहे, त्यांनी शेत गाठत कापसाची लागवड सुरू केली आहे. दरम्यान, तालुक्यात यंदा मुबलक कापूस बियाणे उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याची माहिती कृषी अधिकारी सी. डी. साठे यांनी दिली. तालुक्यात गेल्या खरीप हंगामात पावसाने तडाखा दिला होता. अतिवृष्टी व सततच्या पावसाने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. गेल्या खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी आता शेतकरी सज्ज झाले आहेत. दरम्यान, तालुक्यातील कापूस हे महत्त्वाचे पीक आहे. गेल्या पावसाळ्यात परतीचा पाऊस जास्त झाल्याने यावर्षी कापसाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. सर्वच शेतकऱ्यांची खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्णत्वास आली असून, तालुक्यात यंदा ठिबक संचाच्या साह्याने कापूस लागवडीवर भर देण्यात येणार असल्याचे दिसते. अशा पद्धतीने पिक घेतल्यास सरासरी एकरी दहा ते १२ क्विंटल उत्पन्न होते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतात ठिबकच्या नळ्या अंथरून ठेवल्या आहेत. गिरणा परिसरात बागायती कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची लागवड पूर्व मशागत आटोपली असून, सऱ्या तयार करण्यात आल्या आहेत.

६० हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर होणार कापूस लागवड गेल्या वर्षी कमी उत्पादन झाल्याने दुसरीकडे कपाशीला उच्चांकी भाव मिळाला. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांचा कल कापूस लागवडीकडेच आहे. तालुक्याचे खरीप हंगामासाठी लागवडीखालील क्षेत्र जवळपास ८० हजार हेक्टर इतके आहे. त्यात यंदा तालुक्यात सर्वाधिक ६० हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड होणे अपेक्षीत आहे. त्या खालोखाल मक्याची ११ हजार ३९८ हेक्टर क्षेत्रावर लागवड होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

३ लाख पाकिटे तालुक्यासाठी उपलब्ध गेल्या वर्षी कापसाला मिळालेल्या रेकॉर्डब्रेक भावामुळे यंदा कापूस लागवड वाढली आहे. यंदा तालुक्यात ३ लाख ४ हजार ३६० पाकिटे बियाण्यांची गरज पडणार आहे. त्यातील ३ लाख पाकिटे तालुक्यासाठी उपलब्ध झाल्याने तालुक्यात मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध आहे. यंदाच्या खरिपासाठी कृषी निविष्ठा अंतर्गत सर्व प्रकारचे बियाणे उपलब्ध राहणार आहे. जवळपास २०० उत्पादकांचे कापूस वाण उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी एकाच वाणाचा आग्रह न धरता इतर सर्व वाणातून पेरणीसाठी निवड करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कापसाचे बियाणे १ जूनपासूनच विक्रीचे बंधन कृषी विभागाने घातले होते. तरीही काही शेतकऱ्यांनी पूर्व हंगामी कापूस लागवडीस सुरूवात केली.आता १ जूनपासून सर्व कृषी केंद्रांवर मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध झाल्याने हवामानाचा अंदाज घेत तसेच विहिरींना पाणी व ठिबक संचाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी कापूस लागवडीस सुरूवात केली आहे. यंदा पाऊस वेळेत असल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली असून शेत शिवार तीव्र उन्हातही फुलून गेला आहे. तर मजुरांच्या हातांना ही काम मिळाले आहे.

बातम्या आणखी आहेत...