आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांची पंपाची वीज:अमळनेरात थकबाकीदार 2 हजार शेतकऱ्यांची पंपाची वीज कापणार

अमळनेर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐन रब्बी हंगामाला सुरूवात झालेली असताना तालुक्यात महावितरणने थकीत बिलापोटी कृषी पंपांची वीजजोडणी खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात भरवस विभागातील मुडी प्र.डांगरी, शिरूड, कावपिंप्री, चोपडाई कोंढावळ, वावडे परिसरातील सुमारे ५५० शेतकऱ्यांचे कृषी कनेक्शन कापण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी प्रतिसाद न दिल्यास तालुक्यातील सुमारे दोन हजार थकबाकीदारांना कारवाईचा फटका बसू शकतो.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे अनुदान प्राप्त होताच आता ही कारवाई होत असल्याने, एकीकडे मदत तर दुसरीकडे सक्तीची वसुली होत आहे. त्यामुळे शेतकरी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील कृषीपंपाची वीज कापण्याचा सपाटा महावितरणने सुरु केला आहे.

शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता कृषी पंपांची वीज तोडली जात आहे. वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना मुदत न देता कृषी फीडरचा वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी संतापले आहेत. अतिवृष्टी, कोरोना, लॉकडाऊननंतर आता शेतीचे चक्र हळूहळू रुळावर येत आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा या पिकांना पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. अशा गरजेच्या काळात महावितरणने कृषी पंपांची वीज कापली. त्यामुळे महावितरणच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ऐन रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच महावितरणने कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या, शिंदे-फडवणवीस सरकारने दखल घ्यावी, अशी मागणी आहे.

किमान एक बिल भरावे
शेतीपंपाचे किमान एक तरी बिल शेतकऱ्यांनी भरावे अशी अपेक्षा आहे. काही शेतकरी त्यासाठी दिरंगाई करत असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार वीज जोडणी कापली आहे. शेतकऱ्यांनी किमान एक चालूचे बिल भरून महावितरणला सहकार्य करावे. - प्रशांत ठाकरे, उपविभागीय कार्यकारी अभियंता, अमळनेर

कारवाईविरोधात धरणगावात सेनेचा महावितरणच्या कार्यालयात ठिय्या
धरणगाव | थकबाकीमुळे महावितरणने शेतकऱ्यांचे कृषी कनेक्शन कापण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे संतप्त ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी, धरणगाव येथील सहायक कार्यकारी अभियंता कार्यालयात २५ मिनिटे ठिय्या मांडला. महावितरणने कारवाईची जाचक मोहीम थांबवावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. सहायक कार्यकारी अभियंता रेवतकर यांनी मागणीबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक नरमले. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. धरणगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी हे राज्य शासनात मंत्री आहेत. मात्र शेतकऱ्यांबाबत एक शब्दही बोलत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

कारवाई थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे अभियंत्यांना देण्यात आला. माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, दीपक सोनवणे, राष्ट्रवादीचे दीपक वाघमारे, बाळू पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अॅड.शरद माळी, राजेंद्र ठाकरे, नाना ठाकरे,शहर प्रमुख भागवत चौधरी, धिरेंद्र पुरभे, जितेंद्र धनगर, शेतकरी संघटनेचे जयदीप पाटील, विजय पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...