आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथून जवळच असलेल्या बिडगाव (ता.चोपडा) येथील रहिवासी व आयटीबीटीचे जवान अशोक पाटील यांचा गुवाहाटी येथे उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव गुरूवारी मूळगावी आणण्यात आले. दुपारी एक वाजता शासकीय इतमामात, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. जवान अशोक पाटील यांचे पार्थिव गुरूवारी सकाळी ११ वाजता बिडगाव येथे आणले गेले. त्यानंतर जवानाच्या घरापासून सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवरून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी देशभक्तीपर गितांच्या सुरात ग्रामस्थांनी अंत्ययात्रेवर फुलांचा वर्षाव केला.
३०० फूट लांबीचा तिरंगा घेऊन विद्यार्थी सहभागी झाले. आजी-माजी सैनिकांसह,विद्यार्थी, महिला, पुरुष, परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. दुपारी १ वाजता अंत्ययात्रा माध्यमिक शाळेच्या प्रांगणावर पोहोचली. तेथे पोलिस दलातर्फे २१ फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
तर महसूल विभागातर्फे तहसीलदार अनिल गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी कृषिकेश रावले, सहायक पोलिस निरीक्षक किरण दांडगे, आमदार लता सोनवणे, माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. माजी सभापती कल्पना पाटील, उपसभापती माणिकचंद महाजन, शांताराम पाटील उपस्थित होते.
मुलाने दिला मुखाग्नी : जवानाचे आई, वडील, पत्नी यांच्या आक्रोशाने उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. जवान अशोक पाटील यांच्या ११ वर्षांचा मुलगा कुणाल याने आपल्या वडिलांच्या चितेला मुखाग्नी दिला. विर जवान अमर रहे, जय जवान जय किसान, वंदे मातरम्, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आजी-माजी सैनिकांसह खान्देश रक्षण फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.