आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:चाळीसगावात 20 हजार विद्यार्थी गणवेशाविना, लसीकरणही निम्मे

चाळीसगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व तालुक्यातील शाळांमध्ये आज (दि.१५)विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व नवी कोरी पुस्तके देऊन स्वागत केले जाणार आहे. मात्र गणवेशाच्या निधीला तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने पहिल्या दिवशी तालुक्यातील २० हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहतील. पहिल्या दिवशी केवळ पुस्तकांवरच विद्यार्थ्यांना समाधान मानावे लागणार आहे. अद्याप निम्मे विद्यार्थ्यांनीच लस घेतली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळांचे शैक्षणिक सत्र विस्कळीत झाले होते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी चौथ्या लाटेची भीती आहे. त्यामुळे शाळा प्रवेशोत्सवाचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाेबतच शाळांनी बुधवारपासून येणाऱ्या विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी, पालकांची भेट घेऊन समुपदेशन करावे तसेच शाळाबाह्य मुलांना शाळेत आणावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या. त्यानुसार सोमवारी शहरातील अनेक शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण करण्यात आले. मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी मोठ्या शाळांमध्ये चौकशी करण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. अनेक शाळांमध्ये शिक्षक व मुख्याध्यापक वर्गात आणि वर्गाच्या बाहेर सूचना फलकांवर स्वागतपर संदेश लिहिताना दिसून आले. वर्गासमोर स्वच्छताही केली जात होती. प्रत्येक वर्गास तोरण बांधले आहे. शाळेत पहिल्या दिवशी येणाऱ्या मुलांना प्रसन्न वाटले पाहिजे, ते शाळेमध्ये रमले पाहिजे या दृष्टीने नियोजन केल्याची माहिती विविध शाळा मुख्याध्यापकांनी दिली. शहरातील सर्व शाळांना पाठ्यपुस्तके पाेहाेचल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळतील, असे गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांनी सांगितले.

मुंबईला धाव घ्यावी लागेल विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी फक्त पुस्तकांवरच समाधान मानावे लागणार आहे. कारण तांत्रिक अडचणींमुळे गणवेशाचे अनुदान खात्यावर जमा झालेले नाही. त्यामुळे गणवेशाचा निधी कसा वितरित झालेला नाही. त्यासाठी मुंबई येथे जाऊन निधी खात्यावर टाकला जाईल, असे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

शिक्षकांनी बूस्टर डोस घ्यावा कोरोनाची लाट ओसरल्याने विद्यार्थ्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली. अद्याप अनेक विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी आहे. त्यात १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांचे ४० टक्के तर १५ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांचे जवळपास ६० टक्के लसीकरण झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. तर ज्या शिक्षकांचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने झाले असतील त्यांनी बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...