आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईचा खून:गलंगी येथे किरकोळ भांडणावरून डोक्यात दांडा घालून सावत्र आईचा खून

चोपडा8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून २८ वर्षीय संशयिताने, आपल्या सावत्र आईच्या डोक्यात लाकडी दांडा मारून तिचा खून केला. २५ रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास गलंगी येथे ही घटना घडली. दीपक वेस्ता पावरा असे संशयिताचे नाव असून, सहाबाई वेस्ता पावरा (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मृत महिलेचा पती वेस्ता उर्फ मगन खजान पावरा (वय ५५, रा.रामकुला, ता.वरला, ह.मु गलंगी) हा रमाकांत देवराज (रा.गलंगी) यांच्या शेतात २२ वर्षांपासून मजुरी करतो. त्याची पहिली पत्नी कलाबाई पावरा हिचे वर्षभरापुर्वी निधन झाले आहे. कलाबाई यांना अशोक व दीपक ही दोन मुले आहेत. ते कामानिम्मित कन्नड येथे राहतात. २५ रोजी दुपारी संशयित दीपक व त्याचे मेहुणे दोघे गलंगी येथे आले. तेथे दीपकचे सावत्र आई सहाबाई यांच्यासोबत भांडण झाले. त्यामुळे सहाबाई यांनी दीपक व त्याच्या मेहुण्याला येथे राहू नका असे सांगितले.

मुलगा दीपक व त्याच्या पत्नीला वेस्ता पावराने शांत करून रात्री सोबत जेवण केले. मात्र दीपकने दारूच्या नशेत रात्री वडील वेस्ता व सावत्र आई सहाबाई यांच्यासोबत भांडण केले. त्यावेळी दीपकने वडील वेस्ता पावरा याला दांडक्याने मारहाण केली. तर रात्री १२ वाजेच्या सुमारास त्याने पुन्हा खाटेवर झोपलेल्या सहाबाई यांच्या डोक्यावर दांडक्याने वार करत खून करत पळ काढला. वेस्ता पावरा यांचे जावई विक्रम पावरा सकाळी ७ वाजेच्या सुमारास घरी आला. तेव्हा ही घटना उघडकीस आली. प्रभारी पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, उपनिरीक्षक अमरसिंग वसावे घटनास्थळी पोहोचले. वेस्ता पावरा यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहा दिवसांपूर्वी झाले लग्न
अंमलवाडी येथील रहिवासी सहाबाई पावरा यांच्याशी दहा दिवसांपूर्वीच वेस्ता पावरा यांचे लग्न झाले होते. त्यानंतर सहाबाई गलंगीत आल्या होत्या. लग्नानंतर दहा दिवसांतच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.