आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकन्नड घाटातील वाहतुकीच्या समस्येमुळे वाहनधारक त्रस्त अाहेत. या समस्येवर उपाय म्हणून प्रस्तावित साडेपाच हजार कोटी खर्चाच्या बोगद्याचे काम खर्चामुळे पाच वर्षांपासून रखडले अाहे. त्यामुळे निजाम राजवटीत पाऊलवाट म्हणून ओळखला जाणारा, पाटणादेवीजवळील हत्तीबंगला ते कन्नड तालुक्यातील कळंकीपर्यंतचा तीन किमी लांबीचा रस्ता विकसित केल्यास, कमी खर्चात कन्नड घाट रस्त्याला सक्षम पर्याय निर्माण होऊ शकताे. हा मार्ग झाल्यास कन्नड घाटातील वाहतूक काेंडीच्या समस्येपासून दिलासा मिळू शकतो. चाळीसगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अखत्यारित, पाटणादेवी-गोरखपूर-चाळीसगाव हा राज्यमार्ग क्र.३८४ आहे.
वाहनांचे इंधन आणि वेळ वाचेल, महामार्गाला मिळेल पर्याय
प्रस्तावित रस्ता हा चाळीसगाव येथील केकी मूस कला दालन, वालझिरी येथील तीर्थक्षेत्र व श्रीक्षेत्र पाटणादेवी (चंडिकादेवी) व संभावित भास्कराचार्य यांची गणित नगरी या तीन स्थळांना जोडणारा रस्ता आहे. त्याचप्रमाणे देवळी, डोणदिगर, हिरापूर, गणेशपूर, पाटणादेवी प्रजिमा क्र. ४१ हा मार्गही या रस्त्याला जोडतो. नांदगाव(जि. नाशिक) ते चाळीसगाव या मार्गावरील वाहतूक चाळीसगावला न येता परस्पर या रस्त्यावरून जाऊ शकते. सध्याचा महामार्ग क्रमांक २११ (आताचा क्र.५२) येथून पाटणादेवीला जाणारा राज्यमार्ग ३८३ देखील आहे. अनेक मार्ग पाटणादेवी या तीर्थक्षेत्राला येवून मिळतात. तेथून हत्ती बंगला ते कळंकी हा मार्ग विकसीत झाल्यास महामार्ग २११ ला पर्यायी मार्ग मिळेल.
सरपंचांनी सूचवला होता मार्ग
याबाबत पाटणाचे माजी सरपंच प्रभाकर शितोळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन रस्त्याचा पर्याय सूचवला होता. केंद्रीय मंत्रालयापर्यंत त्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता नवनाथ सोनवणे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. दुर्लक्षित भागाचा विकास करणारा हा पर्याय आहे. याबाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन सूचना केली आहे. शासनाने याबाबत विचार करावा.
रस्त्याचे काम का रखडले?
या रस्त्यासाठी वन विभागाची परवानगी घेऊन जिल्हा परिषदेमार्फत या मार्गास वर्गीकृत केल्यास कमी खर्चात काम होऊ शकते, असे पत्र सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चाळीसगाव यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव यांना पाठवले आहे. मात्र आता ही प्रक्रिया होऊन एक वर्ष उलटले आहे. तरीही याबाबत कुठलिही हालचाल झालेली नाही. त्यामुळे वाहनधारकांना कन्नड घाटातूनच जावे लागते. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या कायम आहे.
दोन महिन्यांत काम होऊ शकते पूर्ण
केवळ तीन किमीचा हा रस्ता केल्यास तो अतिसुरक्षित, कमी खर्चाचा व पर्यटनाला चालना देणारा ठरेल. रस्त्याचे काम सुरू झाले तर दोन महिन्यात हा रस्ता तयार होऊन खुला होऊ शकतो.-एन.पी.सोनवणे, कार्यकारी अभियंता, सार्व.बांधकाम विभाग, जळगाव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.