आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरिचारिका असा शब्द उच्चारताच रुग्णांची अहोरात्र सेवा करणारी, रुग्णांना धीर देणारी व त्यांचे मनोबल उंचावणारी, रुग्णाच्या कुटुंबातीलच एक सदस्य बनून आरोग्याची काळजी घेणारी स्त्री आपल्यासमोर उभी राहते. कोरोना महामारीच्या काळात तर परिचारिकांनी रुग्ण सेवेसाठी वेळप्रसंगी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले. अशीच सेवा संपूर्ण कोविडच्या दोन वर्षात येथील ट्रामा केअर सेंटरच्या परिचारिका मानसी लोखंडे यांनी दिली. त्यांनी या दोन वर्षांच्या काळात तब्बल ६२९ महिलांची प्रसूती त्यांनी सुलभरीत्या पार पाडली. तर ११७ महिलांना प्रसूतीपश्चात कॉपर-टी बसवण्याचे काम त्यांनी केले. कठीण काळातही त्या डगमगल्या नाहीत. त्यांची ही कामगिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात सरस ठरल्याची माहिती तालुका आरोग्याधिकाऱ्यांनी दिली. मानसी लोखंडे यांची पहिली नियुक्ती २००१ मध्ये अमळनेर येथे झाली. त्यानंतर कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे २ वर्ष काम केले. त्यानंतर चाळीसगाव तालुक्यात मेहुणबारे येथे ११ वर्षे, पाचोरा ग्रामीण रुग्णालयात ६ वर्षे सेवा व आता ट्रामा केअर सेंटर येथे सेवेचे काम त्या करत आहेत.
चाळीसगाव हे त्यांचे सासर तर पुण्याचे माहेर आहे. त्यांना दोन मुले असून सौरभ हा १२ वीत तर सचिन हा ९ व्या इयत्तेत शिकत आहे. त्यांना कन्या नसल्याने त्या अधिक काळ महिलांमध्ये रमतात व त्यांची विशेष काळजी घेत सेवा करतात. त्यांच्यासाेबत ट्रामा सेंटरमध्ये रंजना जाधव, सीमा कोळी व मंगल कोळी या परिचारिका असतात. त्यांना जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.किरण पाटील, वैद्यकीय अधिकारी व स्त्रीरोग तज्ञ डॉ.मंदार करंबेळकर यांचे मार्गदर्शन लाभते. परिचारिकांशिवाय वैद्यकीय क्षेत्र पूर्णत्वास जाऊ शकत नाही, असे त्यांनी अभिमानाने नमूद केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.