आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात शेतातील भेंडी आणि वांग्यासह अन्य भाजी-पाल्यांवर फवारणी केल्यानंतर काही दिवसातच ती तोडली जातात. त्यानंतर हाच भाजीपाला नागरिक खातात. यामुळे मोठ्या प्रमाणावर कॅन्सर-सारखे आजार होत असल्याचे, प्रतिपादन मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत राजपूत यांनी चोपड्यात व्यक्त केले.
येथील गोवर्धन गोशाळेत अरण्या फार्मस, विरवाडे व विठ्ठल-अँफ्रो-बीसीआय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘अन्न हेच औषध’ या विषयावर आयोजित व्याख्यानामध्ये मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत राजपूत यांनी मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी आपले आरोग्य व्यवस्थित राखायचे असेल तर जमिनीचे आरोग्य सुधारले पाहिजे, असे मत व्यक्त केले. या वेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, उद्योजक वसंत गुजराथी, विठ्ठल अफ्रो संस्थेचे प्रदीप गुजराथी, दगडू अग्रवाल, अशोक अग्रवाल, प्रवीण गुजराथी, ऋषी गुजराथी, संजय देशमुख आदींसह चोपडा तालुक्यातील आदर्श शेतकरी उपस्थित होते.
विठ्ठल ऍफ्रो बीसीआयचे प्रमुख प्रदीप गुजराथी यांनी प्रास्ताविकात डॉ. राजपूत यांच्या शेती प्रयोगांची माहिती दिली. नोडल अधिकारी संजय देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. व्याख्यानाला विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर तसेच रावेर तालुक्यातील केळी उत्पादन करणारे प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.
अनेक व्याधींचे मूळ अन्न आणि पाण्यातच : डॉ. प्रशांत राजपूत म्हणाले की, गेल्या काही दशकात खते, कीडनाशके आणि तणनाशकांच्या अतिवापराने जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. त्यामुळे आपले आरोग्य व्यवस्थित राखायचे असेल तर जमिनीचे आरोग्य सुधारले पाहिजे. आज दिसणाऱ्या अनेक व्याधींचे मूळ अन्न आणि पाण्यात असून रासायनांचा वापर वाढल्यानंतर ते दिसत असल्याचे डॉ. राजपूत यांनी स्पष्ट केलेे. शेतात सध्या मोठ्या प्रमाणावर घातक औषधी फवारणी केल्याने आपण थेट विष घेत आहोत. त्यामुळे भविष्यात घराघरात कॅन्सर रुग्ण आढळतील. तालुक्यातील चौगाव आणि चुंचाळे तर विदर्भातील कापूस पिकवणाऱ्या भागात किडनीचे जास्त रुग्ण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मलेरिया आजाराचे मूळ कारण फवारणी
जशी देशात कॅन्सर रेल्वे आहे, तशी भविष्यात आपल्याकडे कॅन्सर बस धावल्यास नवल वाटू नये. मलेरिया आजाराचे मूळ कारण फवारणी आहे. श्रीलंकन संसदेत फवारणी बंदचा निर्णय घ्यावा लागला होता. सध्या अमेरिकेत साडेपाच लाख शेतकरी कोणत्याच प्रकारे फवारणी न करता उत्तम शेती करत आहेत. मी स्वतः कोणत्याच प्रकारे फवारणी न करता शेती करत असून माझ्या शेतातील हळद १६ देशात एक्स्पोर्ट करत आहे. तिचा भारतात ८०० रुपये किलो भाव असल्याचे डाॅ. प्रशांत राजपूत यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.