आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खबरदारी:स्थानिक यंत्रणेशी साधला संवाद; अधिकाऱ्यांना केले साहित्य वापराबाबत मार्गदर्शन

चाळीसगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे तालुकावासीयांना विविध संकटांना तोंड द्यावे लागले. त्यात कोट्यवधीचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर नाशिक येथील आर्टिलरी सेंटरचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी येथील तहसील कार्यालयास भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आर्टिलरी सेंटरच्या अधिकाऱ्यांनी पूर परिस्थितीत वापरावयाच्या साहित्याचा परिचय करून देत त्याची उपयुक्तता पटवून दिली. गतवर्षी अतिवृष्टी झाल्याने चाळीसगाव तालुक्यातील पाटणा परिसरात उगमस्थान असलेल्या डोंगरी व तितूर या दोन्ही नद्यांना तब्बल सात पूर आले होते. पहिल्याच पुरात शहर व परिसरातील जवळपास २५०० घरे, झोपड्या, दुकाने, गोठा शेड यांचे नुकसान झाले. तर पाचव्या पुरात या नदी किनाऱ्यालगतची २०० दुकाने व घरे वाहून गेल्याने अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे गेल्या वर्षीसारखी आपत्ती ओढवू नये, यासाठी प्रशासन यंदा सतर्क झाले आहे.

यंत्रणेशी साधला संवाद
गेल्या वर्षीच्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नाशिक आर्टिलरीचे नायब सुभेदार आर.एल. गंगावणे, नायब सुभेदार हेमंत जेना, हवालदार संभाजी, हवालदार सतीश बी., नायक कुंदन कुमार यांनी तहसील कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षाला भेट देत तहसीलदार अमोल मोरे यांच्याशी चर्चा केली. तालुक्यातून वाहणाऱ्या तितूर, डोंगरी, मन्याड व गिरणा या नद्यांची पावसाळ्यात पाणी पातळी वाढून पूर परिस्थिती निर्माण होते. त्यावेळी नदीकाठचे शेतशिवार व घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांना व गुराढोरांना सुरक्षित स्थळी हलवावे लागते. या संभाव्य परिस्थितीत जीवितहानी टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची त्यांनी चर्चा केली. निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे आणि लिपीक दीपक जोंधळे यांच्यासोबत त्यांनी संभाव्य परिस्थितीत वापरावयाच्या विविध साहित्याची पाहणी केली. हे सर्व साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयाने पुरवले आहे.

आपत्ती निवारण कक्षाची स्थापना
तहसील कार्यालयात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांसाठी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर व तहसीलदार अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यात तालुक्यातील विविध शासकीय विभागातील ९३ वर्ग ३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना रात्री ८ ते सकाळी ८ दरम्यान कक्षात उपस्थिती बंधनकारक करण्यात आली असून या काळात पूर, वीज व दरड कोसळणे आदी आपत्तींबाबतची माहिती जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांना कळवण्यात येते. -जितेंद्र धनराळे, नायब तहसीलदार.

आवश्यकता भासल्यास धुळे, पुणे, नाशिकहून सेनेला करणार पाचारण
बॉडी कव्हर, अर्धा कि.मी. पर्यंत रेंज असलेला मोठा टॉर्च, सेफ्टी रिंग, मोठे दोरखंड या साहित्याची पाहणी केली. ते कसे वापरायचे याची माहिती दिली. काही ठिकाणी पाणी पातळी वाढून पूर परिस्थितीत ग्रामस्थ अडकल्यास त्यांना तेथून हलवता यावे म्हणून वापरावे लागणारे बेल्ट, दोर अशा साहित्याची चाचपणी केली. पूरस्थिती निर्माण झाल्यास सैन्य दलाची मदत घेण्यात येते. मात्र, त्यासाठीचे साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आधीच पोहोचवण्यात आले आहे. आवश्यकता भासली तरच धुळे, पुणे, नाशिक आदी ठिकाणांहून सेनेला पाचारण करता येते, अशी माहिती नायब सुभेदार आर.एल. गंगावणे यांनी दिली. गेल्या वर्षी कशा पद्धतीने आपत्तींमुळे नुकसान झाले याची माहितीही या अधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे यंदा पूरस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत मिळू शकणार आहे

बातम्या आणखी आहेत...