आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतशिवार:सीताफळात हादग्याचे आंतरपीक; वाकोद येथील दिव्यांग शेतकरी अंबादास शिरसाठ यांचा वेगळा प्रयोग

वाकोद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील दिव्यांग शेतकरी अंबादास सिरसाठ यांनी सीताफळांची लागवड करून त्यात हादगा फुलांचे आंतरपिक घेण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांनी आपल्या शेतात १२ बाय ६ फुटांच्या अंतरावर सीताफळ लागवड करून ६ फुटांवर हादगा लागवड केली आहे. सव्वा एकर क्षेत्रात ६०० सीताफळ झाडांची लागवड करून दोन वर्षे झाली आहे. तर दोन एकर क्षेत्रात १२ बाय ८ अंतरावर ताइवान पिंक पेरूची ९०० रोप लावली आहेत.अंबादास सिरसाठ हे दोन्ही पायांनी दिव्यांग असून त्यांनी बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेतले आहे. ते नोकरी न करता शेतीकडे वळले.

या पेरूच्या क्षेत्रात पपई, मका यांचे अंतरपीक घेतले आहे. या पिकांनाही दोन वर्षे झाली असून आतापर्यंत दीड लाख रूपये खर्च आला आहे. पुढच्या वर्षी पाच ते सहा लाख रूपयांचे सीताफळ, पेरू,पपई यांचे उत्पन्न होईल. ताइवान पिंक जातीच्या पेरूचे पाच फुटापर्यंत वाढ झाली आहे. कारण उंची कमी ठेवल्यास एका पेरूचे वजन पाचशे ते साताशे ग्रॅम असते. फळ मोठे असल्याने सुरत येथे चांगला भाव मिळतो असे शेतकरी सिरसाठ यांनी सांगितले. शेती बरोबरच सिरसाठ यांनी कुक्कुटपालन व्यवसायाची निवड करून साठेचार लाख रूपये खर्च करून बंदिस्त गावरान कुक्कुटपालन सुरू केले आहे. त्यांच्या शेडमध्ये ३०० मोठे व ४०० लहान पक्षी आहेत.

शेड, कंपाउंड यासाठी साडेचार लाख रूपये खर्च आला आहे. कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करून आठ महिने झाले असून काही दिवसांनी उत्पन्न सुरू होईल. कुक्कुटपालन व्यवसायात सात लाखापर्यंत उत्पन्न होईल. शेतीपूरक व्यवसाय म्हणून आजही ग्रामीण भागात कुक्कुटपालन केले जाते. हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी सर्वात सोयीस्कर जोडधंदा आहे. त्याच्या व्यवस्थापनातील खर्चसुद्धा शेतकऱ्याला परवडणारा आहे. सध्या जास्तीतजास्त ग्रामीण युवक कुक्कुटपालनाकडे वळत आहे, असे सिरसाठ यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...