आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजामनेर तालुक्यात राष्ट्रवादी अन् काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यासाठी झालेल्या वाटाघाटीत आठ पैकी सहा गट राष्ट्रवादी तर दोन गट काँग्रेसला दिले जाण्याबाबतची तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या संदर्भात १५ ऑगस्टनंतर केव्हाही आचारसंहिता लागून ऑगस्ट अखेरीला निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीने प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली असून सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छुकांकडून ही गण-गटांची पडताळणी सुरू आहे.
आजघडीला तालुक्यात भाजपची स्थिती भक्कम असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या माध्यमातून शह देण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे. त्यासाठी सहा- दोनच्या फार्मुल्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती एका प्रमुख कार्यकर्त्याने ‘दिव्य मराठी’ला दिली. यात राष्ट्रवादीला सहा तर काँग्रेसला दोन गट देण्याबाबत विचार राष्ट्रवादीच्या गोटात सुरू असला तरी काँग्रेसकडून ५०-५०च्या फार्मुल्याचा आग्रह धरला जात असल्याचे मत काँग्रेस नेते व्यक्त करत आहेत.
गटबाजीमुळे नुकसान ...
तालुकाध्यक्ष पदासह अन्य कारणांवरून नेत्यांमध्ये गटबाजी असल्याने काँग्रेसचे नुकसान होत आहे. अशीच काहिशी परिस्थिती राष्ट्रवादीतही आहे. दोनही प्रमुख विरोधी पक्षांच्या तालुकाध्यक्ष निवडीचे आपसात वाद आहेत. त्यामुळे दोनही पक्षातील गटबाजीचा सहाजिकच भाजपला लाभ होतो. एकहाती सूत्र असल्याने भाजपत याउलट परिस्थिती आहे.
सेनेचीही तयारी
राज्यात महाविकास आघाडीच्या अंतर्गत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार आहे. तालुक्यातही या प्रकारे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली जावी, असा काही सेना नेत्यांचा प्रयत्न आहे. मात्र, सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास सेना स्वतंत्र-रित्या निवडणूक लढू शकते, असे मत सेनेचे पदाधिकारी व्यक्त करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.