आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे माहिजी देवी यात्रोत्सवास आजपासून सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी गुरुवारी गावातून देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. आई भगवती पालखी नगर प्रदक्षिणा सकाळी ७.३० वाजता झाली. ६ रोजी आई भगवती यात्रोत्सव, ७ रोजी आई भगवती उत्तर यात्रोत्सव होईल. गावातील हरिपाठ महिला मंडळ, तरुण-तरुणी व आबालवृध्दांंनी ५ रोजी टाळ, मृदंग व भजनी मंडळाच्या सोबतीने आई भगवती माहिजी देवी पालखी मिरवणुकीत सहभाग घेतला.
लघुमाहिजी देवी यात्रोत्सवात परिसरातील हजारो भाविक यात्रेत सहभागी होऊन देवीचे दर्शन घेतात. गावापासून उत्तरेस उंच कळस असलेले सुंदर लघुमाहिजी देवीचे भव्य पुरातन मंदिर आहे. मंदिरात अखंड दगडावर कोरीव सिंहावर आरूढ असलेली देवीची भव्य मूर्ती आहे. ही देवी आजही सप्तशृंगी देवीचे प्रतिरूप म्हणून ओळखली जाते. प्राचीन काळात देवीच्या मंदिराच्या जागेवर एक मोठा वटवृक्ष होता. या वृक्षाखाली उदासी नावाच्या तपस्वी महाराजांची पर्णकुटी होती. सभोवताली झाडाझुडपांसह पडीक शेतजमीन होती.
या जमिनीची मशागत करताना एका शेतकन्याला त्रिशूळ आकाराच्या दगडाचे तीन सुरेख बाण सापडले. सप्तशृंगी देवीला सात बहिणी होत्या. त्यापैकी सर्वात लहान बहिणीचे नाव माहिजी देवी होते. ती सर्वांत लहान असल्याने या देवीला लघुमाहिजी असे संबोधले जाते, अशी अख्यायिका आहे.
रोडग्याचा असतो प्रसाद पौष शु. चतुर्दशीला मानलेला नवस फेडण्यासाठी परिसरातील भाविक येतात. देवीला नैवेद्य म्हणून वरण व रोडग्याचा प्रसाद अर्पण केला जातो. तर पौर्णिमेच्या दिवशी भाविकांच्या योगदानातून गुळाचा शिरा व महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.