आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीची अपेक्षा:लंपीने मृत जनावरांच्या आकडेवारीतील तफावतीची चौकशी ; ठोस मदतही देणार

सावदा, फैजपूर, रावेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील पशुधनावर लंपी या त्वचा आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी दुपारी मस्कावद, खिरोदा (ता.रावेर) व फैजपूर (ता.यावल) या भागात १ तास ३५ मिनिटांचा दौरा करत बाधित पशुधनाची पाहणी केली. यावेळी पशुपालक, शेतकऱ्यांनी लंपीमुळे जनावरे दगावल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले, अशी व्यथा मांडली. तसेच प्रशासन लंपीमुळे मृत जनावरांची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप केला. या प्रकाराची चौकशी करण्यासह कॅबिनेट बैठकीत निर्णय घेऊन ठोस मदतीचे आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिले.

गुरुवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास मंत्री विखे-पाटील हे जळगाव येथून मोटारीने भुसावळहून फैजपूरकडे निघाले. रस्त्यात पाडळसा येथे स्व.हरिभाऊ जावळे विचार मंचतर्फे मीराताई अविनाश तायडे व शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी निवेदन दिले. नंतर मंत्र्यांचा ताफा सावदा मार्गे मस्कावद (ता.रावेर) येथे आला. तेथे त्यांनी केवळ पाच मिनिटे लंपी बाधित जनावरांची पाहणी केली. तेथून खिरोद्याकडे जाताना सावदा येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी निवेदन दिले.

खिरोदा येथे मंत्र्यांनी गावातील बाधित पशुधनाची पाहणी केली. शेतकऱ्यांनी त्यांना गावात लंपीमुळे २०० ते २५० जनावरे दगावली आहेत. तरीही शासकीय आकडेवारी कमी दाखवली जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देवूनही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासकीय औषधीचा पुरवठा न करता पैशांची मागणी केली, अशी तक्रार केली. तसेच पशुधनावर महागडे उपचार कसे करायचे? अशी व्यथा देखील मांडली. खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत, जि.चे.सीईओ डॉ.पंकज आशिया महसूल आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना खर्चात टाकू नका
फैजपूर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सायंकाळी ५ वाजता फैजपूर येथे भेट दिली. येथील शेतकऱ्यांकडून गुरांना हा आजार केव्हा झाला? उपचार कसे केले. लसीकरण केलेल्या जनावरांना देखील संसर्ग झाला का? ही माहिती घेतली. पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपचारांबाबत माहिती दिली. मात्र, शेतकऱ्यांना खर्चात टाकू नका. शासनाकडून औषधी उपलब्ध करा, असे मंत्री म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...