आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रादुर्भाव:अमळनेरात लम्पीचा शिरकाव; पाच गावांत १८ गुरे ग्रस्त, त्यापैकी दोन पडली मृत्युमुखी

अमळनेर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात गुरांवरील लंपी या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. आजवर तालुक्यात पाच गावांमधील १८ गुरांना या आजाराची लागण झाली असून, दोन गुरांचा मृत्यू झाला आहे. लंपीग्रस्त गुरे आढळलेल्या गावांच्या पाच किमी परिघातील गावांमध्ये, गुरांचे लंपी प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पशुपालकांनी आपल्या गुरांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले.गेल्या काही दिवसांपासून लंपी आजाराने राज्यात थैमान घातले आहे. या रोगाने बाधित होणाऱ्या जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारात गुरांना ताप येतो. दुधाळ जनावरांची क्षमता कमी होते.

चिलटे, माश्या, गोचिड, डासांद्वारे रोगाचा फैलाव
लंपी आजाराचा प्रादुर्भाव प्रामुख्याने माश्या, डास, गोचिड, चिलटे आदी किटकांच्या चावण्यामुळे होतो. त्यामुळे पशुपालकांनी गोठ्यातील भिणभिणणाऱ्या माशांचा बंदोबस्त करावा. बाधित जनावरांच्या स्पर्शाने ही इतर जनावरांनाही आजाराची लागण होते. त्यामुळे बाधित जनावर हे इतर जनावरांपासून सुरक्षित अंतरावर बांधावे. लंपीचे विषाणू सक्रमणातर रक्तात पसरल्यावर एक ते दोन आठवडे राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी. गुरांचे लसीकरण करून घेतल्यास सुरक्षा मिळते.

अशी आहेत लक्षणे
गुरांच्या डोळ्यातून पाणी येणे, आठवडाभर ताप, त्वचेवर मोठ्या प्रमाणावर गाठी होणे ही लंपी आजाराची लक्षणे आहेत. जनावरांच्या नाकातून निघणारा श्राव व तोंडातून निघणारे पाणी व लाळ ही चारा आणि पाणी दूषित करते. त्यामुळे इतर निरोगी गुरांनादेखील लंपीची लागण होते. त्यामुळे गुरे मालकांनी सर्व जनावरांना एकाच ठिकाणी चारा खायला घालू नये. तसेच गावहाळात पाणी पाजू नये. गुरांच्या त्वचेवरील निघणाऱ्या खलपीत लंपीचे विषाणू असतात. त्यामुळे गुरे मालकांनीही काळजी घ्यावी.

खासगी उपचारांवर प्रतिबंध
जळगाव |जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी दिले आहेत. गुरांचे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवावे, इतर राज्यांमधून पशुधनाची होणारी वाहतूक बंद करावी, सार्वजनिक चराई व गुरांचे हौद पुढील १५ दिवस बंद, गोठ्यांमध्ये ग्रामपंचायतीनीफवारणी करावी, मृत पशुंची शास्त्रीय विल्हेवाट लावण्यासाठी ४ बाय ८ फुटाचे खड्डेे, या आजारावर पशुधन विकास अधिकारी किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने उपचार करावे, खासगी डॉक्टरांनी उपचार केल्यास कारवाई होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...