आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मंडप ना बँडबाजा, केवळ पोह्यांवर विवाहाचा बार; पारधी समाज वऱ्हाडींनी लुटला नृत्याचा आनंद

पाचोरा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलिकडच्या काळात लाखो रुपये खर्च करून मुलामुलींचे विवाह अतिशय थाटामाटात पार पाडण्याची प्रथा रूढ झाली आहे. काहीजण तर लग्नसोहळ्यासाठी कर्ज काढतात. पुढे जावून त्यामुळे अनेक कुटुंबे अडचणीतही येतात. मात्र अनेक समाजांमध्ये अद्यापही गरिबीमुळे मुलामुलींचा विवाह अत्यंत साधी पद्धत प्रचलित आहे. त्याचा प्रत्यय शहरातील श्री मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ वर्षभरापासून पाल टाकून राहणाऱ्या फासे पारधी समाजबांधवांच्या विवाहात आला.

मूूळचे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील राजूर गणपती गावातील पारधी समाजबांधव मण्यांच्या पोत विकून चरितार्थ चालवतात. त्यातील एक कुटुंबात १८ रोजी झालेल्या साध्या विवाहाने सारेच स्तंभित झाले. एकीकडे आपण मोठे शाही विवाह बघितले असल्याने हा गरीब विवाहाचा सोहळा अनेकांच्या पचनी पडला नाही. एम. एम. महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वारालगत खुल्या भूखंडावर १५ ते २० फासेपारधी समाजाची कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यातील सिमरन हकीम पवार हिचा विवाह राजूर गणपती येथील तोलिंग शंकर भोसले याच्याशी शनिवारी साधेपणाने संपन्न झाला. विवाह सोहळ्यात ना मंडप, बँड, ना मिष्टान्न भोजनाची मेजवानी होती. अगदी साध्या पद्धतीने सकाळी या कुटुंबांमधील समाज बांधवांच्या उपस्थितीत नवरदेव व नवरीला हळद लावण्यात आली. दुपारी १२ वाजता भडगाव रोडवरील कैलामाता मंदिरातून येथील महालपुरे मंगल कार्यालयात अन्य एका लग्नातील नवरदेवाची वरात बँडच्या तालावर जात होती. त्याच वरातीच्या बाजूला उभे राहून फासे पारधी समाजाच्या वऱ्हाडी मंडळींनी नृत्य केले. त्यानंतर विवाह संपन्न होऊन सर्व वऱ्हाडी समोरच असलेल्या एका हॉटेलवर पोहोचले. तेथे प्रत्येकास एक प्लेट पोह्यांची मेजवानी मिळाल्याने आबालवृद्ध प्रत्येक वऱ्हाडी आनंदात होता.

बातम्या आणखी आहेत...