आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य सांभाळा:एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात मे हीटचा तडाखा; दोन दिवस धोक्याचे, सकाळी 9 वाजेपर्यंत कामे उरका अन् घरातच बसा

चाळीसगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात मे हिटचा तडाखा जाणवत आहे. गेल्या आठवड्यातच मेहुणबारे येथे एका शेत मजुराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने परिस्थिती गंभीर असल्याचे जाणवत आहे. त्यात बुधवारी तापमान थेट ४१ अंशांवर गेल्याने उन्हाचा अधिकच परिणाम जाणवला.

गेल्या आठवड्यापासून उष्णतेच्या लाटांनी पोळणाऱ्या चाळीसगावकरांची अजून किमान दोन दिवस तरी तीव्र तापमानापासून सुटका होण्याची चिन्हे नाहीत. कारण मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार ७ एप्रिलपर्यंत कमाल तापमान ४४ ते ४३ अंशांदरम्यान राहिल. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नका, सकाळी १० वाजेपर्यंत कामे उरका व दिवसभर घरात बसावे. या वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका आहे, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला आहे.

शहरासह तालुक्यात मार्चपासूनच उष्णतेचा पारा सातत्याने ४० अंश सेल्सियसवर जात असल्याने यंदा चाळीसगावकर उन्हाच्या चटक्यांनी हैराण झाले आहेत. उन्हाचा पारा थेट ४१ अंशांवर गेल्याने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. नेहमी दिवसभर गर्दीने गजबजणारे स्टेशन रोड, गणेश रोड, भडगाव रोड व घाट रोडवर दुपारी शुकशुकाट व रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसून येत आहे. सायंकाळी ६ वाजेनंतर नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वात अधिक तापमान असल्याचे सांगण्यात येत आहे. वाढत्या तापमानात प्रकृती बिघडून मुलांसह वृद्धांना त्रास होण्याची भीती आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावी
प्रत्येकाने उन्हात प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी, वारंवार पाणी प्यावे. शक्यतो उन्हात बाहेर जाणे टाळावे. बाहेर पडताना सैल, सौम्य रंगाचे कपडे तसेच टोपी, रुमाल, छत्रीचा वापर करावा. सावलीच्या ठिकाणी थांबावे. सकाळी ११ ते ४ दरम्यान उन्हात फिरणे व भर उन्हात शीतपेय, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक पिणे टाळावे. डॉ. सुजीत वाघ

दुपारी शेतात जाणे टाळा
उष्णतेच्या लाटेचे ग्रामीण भागातही परिणाम दिसत आहेत. गत आठवड्यातच मेहुणबारे येथे एका शेत मजुराचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्यतो दुपारी शेतात जाणे टाळावे. डोक्याला रुमाल बांधावा. तसेच मुक्या प्राण्यांवरही परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांनी गोठ्यातील पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी, गोठ्याच्या छपरावर गवत टाकावे, जेणेकरून उष्णतेची दाहकता कमी होईल. जनावरांना पुरेसे शुद्ध व थंड पाणी पिण्यास द्यावे, प्रथिनयुक्त, हिरवा चारा खाऊ घालावा. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शेतातील पिकांसाठी ठिबक संचाचा वापर करावा.

बातम्या आणखी आहेत...