आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:मद्य प्राशन केलेल्या पत्नीचा पतीकडून खून; मेहुणबारेची घटना, पतीला पोलिसांकडून अटक

चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीने मद्य प्राशन केल्याने संताप अनावर झालेल्या सालदार पतीने कुऱ्हाडीचा घाव डोक्यात घालून पत्नीचा खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील मेहुणबारे येथे घडली. पत्नीचा खून केल्यानंतर बाजरीच्या शेतात लपलेल्या खूनी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. नीनुबाई कुवरसिंग पावरा असे मृत महिलेचे नाव आहे.

मेहुणबारे येथील ज्ञानेश्वर सोमनाथ माळी यांच्या काकूच्या शेतात मध्य प्रदेशातील मोहरतमाळ (ता. नेवाली जि. बडवानी) येथील कुवरसिंग चतरसिंग पावरा हा पत्नी व ३ मुलांसह वर्षभरापासून कामासाठी आलेला होता. होळीनिमित्त आठ दिवसापूर्वी कुवरसिंगची मुले गावी गेले होते. त्यामुळे शेतात दोघे पती-पत्नीच होते. १८ राेजी रात्री १० वाजेच्या सुमारास कुवरसिंग व त्याची पत्नी नीनुबाई यांच्यात मद्य पिण्यावरून वाद झाला. कुवरसिंगने पत्नी नीनुबाईस मद्य का प्राशन केले, असे विचारले. या वेळी झालेल्या वादात कुवरसिंगने नीनुबाईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिच्या डोक्यात कुऱ्हाड घातली. डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने घाबरलेल्या कुवरसिंगने कुऱ्हाड तेथेच टाकून गावात धाव घेतली. त्यानंतर शेतमालक व इतर नातलगांना पत्नीस काहीतरी झाले, ती बोलत नाही, अशी बतावणी केली.

बाजरीच्या शेतातून ताब्यात
घटनेची माहिती मेहुणबारे पोलिसांना मिळताच सपोनि विष्णू आव्हाड, उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, हवालदार धर्मराज पाटील, सुभाष पाटील, मोहन सोनवणे, गोरख चकोर, हनुमंत वाघेरे, योगेश बोडके यांनी घटनास्थळ गाठले. या वेळी कुवरसिंग हा बाजरीच्या शेतात लपून बसला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी ज्ञानेश्वर माळी यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिसांत कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल आहे.

बातम्या आणखी आहेत...