आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:पोलिसांचे दुर्लक्ष  स्कूटीला ट्रकची धडक, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको; चाळीसगावात अवजड वाहनांना बंदी, तरी वाहतूक सुरू, विद्यार्थिनीचा बळी

चाळीसगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिकवणी आटोपून दुचाकीने घराकडे निघालेल्या नववीच्या विद्यार्थिनीला, रिकाम्या ट्रकने चिरडल्याची घटना, धुळे रोडवर २९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. सायली भागवत हाडपे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. चाळीसगाव शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी आहे. याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे अवजड वाहने शहरात शिरकाव करतात. याच अवजड वाहनामुळे विद्यार्थिनीचा बळी गेला.

शहरातील शिवदर्शन कॉलनीतील रहिवासी प्राथमिक शिक्षक भागवत राजधर हाडपे यांची मुलगी, सायली ही सेंट जोसेफ इंग्लिश स्कूलमध्ये नववीत शिकत होती. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ती शिकवणीसाठी घराबाहेर पडली होती. रात्री ८ वाजता शिकवणी आटोपल्यानंतर ती आपल्या स्कूटीने (क्र.जीजे.०६-बीओ-०४५४)घराकडे निघाली होती. वाटेत दुचाकीला मागून येणाऱ्या रिकाम्या ट्रकने (क्र.एम.एच.४६-एफ.३२३२) धडक दिली. यात सायली ही ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडल्याने, तिचा एक हात व पाय टायरखाली चिरडला गेला, तसेच डोक्याला मार लागला. त्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात जिवाच्या आकांताने आक्रोश करत होती. घटनेनंतर नागरिकांनी तिला खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला नाशिक येथे हलवण्याचा सल्ला दिला. वाटेतच तिची प्राणज्योत विझली. अपघातानंतर ट्रकचालक वाहन सोडून पसार झाला. शहर पोलिसांनी ट्रक जप्त केला.

बायपासवर कमान उभारणार औरंगाबाद बायपास व धुळे बायपास या दोन्ही ठिकाणी कमान उभारावी, अशी मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली. पोलिस निरीक्षक के.के.पाटील व मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी आंदोलकांची मागणी मान्य केली.

वडिलांच्या मित्रांनी कळवली घटना
अपघात झाल्यानंतर सायलीचे वडील भागवत हाडपे यांच्या काही शिक्षक मित्रांनी ही घटना पहिली. तसेच सायलीला त्यांनी ओळखले. त्यांनी सायलीच्या वडिलांना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यावेळी भागवत हाडपे हे स्वतः आजारी असल्याने ते रुग्णालयात डॉक्टरांकडे आले होते. त्यांना या घटनेमुळे जबर मानसिक धक्का बसला.

अभियंता होण्याचे स्वप्न अपूर्ण... सायली अभ्यासह हुशार होती. तिला चित्रकला व इंग्रजी विषयात अधिक रस होता. भविष्यात आयटी क्षेत्रात अभियंता होण्याचे तिचे स्वप्न होते. तिचे वडील भागवत हाडपे हे जिल्हा परिषद शाळा खेडगाव ता. चाळीसगाव येथे शिक्षक आहेत. तिच्या पश्चात आई, वडील, सहा वर्षांचा भाऊ असा परिवार आहे. भोरस येथे ३० रोजी सकाळी अंत्यसंस्कार झाले.

नागरिकांचा पोलिसांवर रोष
मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी संतप्त नागरिकांसह अपघातानंतर घटनास्थळी रास्तारोको आंदोलन केले. अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी असताना, ही वाहने शहरात शिरकाव करतात. याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने अपघात होतात, असा संताप यावेळी व्यक्त केला. शिवसेनेच्या सविता कुमावत, युवासेनेचे हर्षल माळी, कुणाल पाटील, सौरव पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...