आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिम येथील कर्करोगाने ग्रस्त रुग्णालयात दाखल असलेल्या आईची मुलाचे लग्न पाहण्याची अंतिम इच्छा हाेती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाचे लग्न ठरवण्यात आले. परंतु, लग्न घटिका जवळ येत असतानाच पुन्हा आईच्या आजाराने डाेके वर काढले. तर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आईने मुलाच्या हळदीच्या दिवशीच रुग्णालयात मुलगा व सुनेला जवळ बाेलावून आशीर्वाद दिले. तर हळदीचा कार्यक्रम व्हिडिओ काॅलने पाहत असतानाच आईने जगाचा निराेप घेतला.
अमळनेर तालुक्यातील निम येथील सरलाबाई गुर्जर व गुलाब सुपडू गुर्जर यांनी काळ्या मातीत घाम गाळून मुलगा व मुलीला उच्च शिक्षित केले. मुलगा अभियंता तर मुलीला पदवीधर केले. मुलीचे लग्न झाले, मात्र मुलाला नोकरी लागताच आई सरलाबाईला कर्करोगाने ग्रासले. यामुळे सरलाबाईंची वर्षभरापासून प्रकृती चिंताजनक हाेती.
मुलाचे लग्न माझ्या डोळ्यासमोर व्हायला हवे, अशी भावना त्यांनी पती गुलाब गुर्जर यांच्याकडे व्यक्त केली. त्यामुळे गुलाब गुर्जर व त्यांचे बंधू राजेंद्र पाटील यांनी अभियंता असलेला मुलगा राकेश याचा चोपडा तालुक्यातील मंगरूळ येथील शेती-निष्ठ परिवारातील अशोक गंगाधर पाटील यांची कन्या रोहिणीशी नक्की केला.
एमएस्सी शिक्षण पूर्ण केलेल्या राेहिणी व राकेश यांना ३ रोजी हळद लागणार हाेती. तर ४ रोजी १०.३० वाजता त्यांचा लग्न सोहळा पार पडणार हाेता.
लग्न दोन दिवसांवर असताना सरलाबाई यांच्या आजाराने डाेके वर काढले. त्यामुळे त्यांना अमळनेर येथील डॉ. बहुगुणे यांच्याकडे उपचारार्थ दाखल केले. नातेवाईकांनी डॉक्टरांना त्यांच्या मुलाच्या लग्नाची कल्पना दिली होती. तर डॉक्टरांनी ही शर्थीचे प्रयत्न सुरूच ठेवले. ३ रोजी देवांना नारळ अर्पण करून हळद लावण्यापूर्वी वर मुलगा राकेश व नववधू रोहिणी यांनी रुग्णालयात जाऊन सरलाबाई यांचे आशीर्वाद घेतले.
सरलाबाईंनी नववधू व वर मुलाला जोडीने पाहून प्रसन्न होत आशीर्वाद दिला. तसेच बेटा, नाराज राहू नको, मी लवकर उठून उभी राहिल, काळजी करू नको, असे सांगितले. तर सून रोहिणीला अष्टपुत्र सौभाग्यवती म्हणून दोन्हींच्या पाठीवरून हात फिरवत सुन व मुलाचा मुका घेतला. हळदीला उशीर होईल म्हणून लवकर जा, असे सांगून रुग्णालयातूनच त्यांना विदा केले. तर डॉक्टरांनी ही सरलाबाईंना प्रसन्न पाहून सुटकेचा निश्वास सोडला.
व्हिडिओ काॅलवर हळद समारंभ पाहून मातेने घेतला निराेप मुलाला हळद लागत असल्याचे व्हिडिओकॉलने पाहून सरलाबाईंनी पाणी मागितले. हळद लागल्यानंतर सरलाबाईंनी डॉक्टरांना आता माझी इच्छा पूर्ण झाली. मला चिंता नाही, असे म्हणत सायंकाळी ७.१० वाजता जगाचा निरोप घेतला. लागलीच रुग्णालयात उपस्थित नातेवाइकांनी कुटुंबिय व गावातील भावबंधांना सरलाबाईंच्या मृत्युची वार्ता कळवली. मात्र, वर-वधू कडील नातेवाईकांनी सरलाबाई यांच्या मृत्यूचे दुःख छातीवर दगड ठेवून लग्न लावून देत नवरदेवाच्या आईची इच्छा पूर्ण केली.
मुलाला दु:ख असह्य ...
वर राकेशला लग्न झाल्यावर ही घटना कळताच टाहो फोडत त्याने ‘आई, तुझी इच्छा पूर्ण केली, असे म्हणत अश्रुंना वाट माेकळी करुन दिली. शेवटी वडील, काका व नातेवाइकांनी व कपिलेश्वर संस्थानचे सचिव मघन पाटील, छोटू पाटील, डॉ. एल. डी. चौधरी, मधुकर चौधरी यांनी राकेशला धीर देत मृत सरलाबाई यांच्यावर दुपारी १२.३० वाजता मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हळहळ व्यक्त झाली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.