आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशय:कासोद्यात गॅस कटरने एटीएम कापून साडेनऊ लाख लंपास ; चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी आधी रेकी केल्याचा संशय

कासोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील युनियन बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून, नऊ लाख ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ३१ मे रोजी मध्यरात्री २ ते पहाटे ४.३० दरम्यान ही घटना घडली. कासोदा येथील बिर्ला चौक परिसरात युनियन बँकेचे एटीएम आहे. ३१ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम मशीन कापून त्यातील रोकड लांबवली. चोरट्यांनी सोबत चारचाकी आणली होती, त्यातूनच ते पसार झाले. बुधवारी सकाळी पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी काकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, सहायक निरीक्षक नीता कायटे यांनी घटनास्थळी पाहणी केली. जंजीर या श्वानास पाचारण करण्यात आले होते. मात्र, त्याला चोरट्यांचा माग दाखवता आला नाही. या ठिकाणी ठसे तज्ञांना देखील बोलवण्यात आले होते. चोरीमुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

दोन हजारांची नोट आढळली एटीएम गॅस कटरने कापताना, आतील नोटा जळाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एटीएमच्या बाहेर दोन हजार रुपयांची एक नोट आढळून आली. ती पोलिसांनी जप्त केली. एटीएमवर सुरक्षा रक्षत तैनात नव्हता, त्यामुळे चोरट्यांचे फावले.

यापूर्वी अनेक चोऱ्या... कासोद्यात यापुर्वी २५ ऑगस्ट २०२० रोजी मुकुंद अंबादास कुळकर्णी यांच्याकडे आठ लाख रुपयांची चोरी झाली होती. तर ६ जानेवारी २०२२ रोजी भडगाव रोडवरील स्वामी समर्थ केंद्रातून दानपेटीतील रक्कम चोरांनी लांबवली होती. तसेच येथील विश्रामनगरमधील विलास पाटील व समाधान पाटील यांच्या घरातही त्याच दिवशी चोरी झाली होती. तसेच १२ फेब्रुवारीला दामू कुंभार यांच्याकडे देखील बिर्ला चौक परिसरात चोरी झाल्याची नोंद पोलिसात आहे. दरम्यान एटीएम फोडण्यापूर्वी चोरांनी रेकी केल्याचा संशय आहे.

बातम्या आणखी आहेत...