आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईचा बडगा:चाळीसगाव पालिकेची 600 थकबाकीदारांना नोटीस; लोकअदालतीत दाखल होणार प्रकरणे; ४० लाखांच्या वसुलीसाठी काेर्टात प्रकरणे दाखल

चाळीसगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • थकबाकीदारांमध्ये खळबळ; सूचना देवूनही करदात्यांचे दुर्लक्ष

कारवाईचा बडगा

शहरात जवळपास चार वर्षापासून थकीत कर न भरणाऱ्या थकबाकीदारांना कर भरण्याचे आवाहन करून ही त्यांनी कर भरला नाही. शहरातील अशा जवळपास ६०० थकबाकीदारांना पालिकेने नोटीस बजावल्या आहेत. ६ मेपर्यंत थकबाकी भरणे आवश्यक आहे, अन्यथा ७ मे रोजी चाळीसगाव न्यायालयातील लोक अदालतीत ही प्रकरणे ठेवली जाणार अाहेत. त्या थकबाकीदारांना ७ मे रोजी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. शहरात जवळपास २२ हजार ४६० मालमत्ताधारक आहेत.

थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
चाळीसगाव नगरपालिका ‘ब’ वर्गात मोडते. शहरात जवळपास २२ हजार ४६० मालमत्ताधारक आहेत. तर एकुण १७ हजार ३०० नळ जोडण्यात देण्यात आल्या आहेत. यंदा पालिकेने कर वसुलीसाठी कंबर कसली होती. या विशेष मोहिमे अंतर्गत शहरातील जवळपास ९० नळ जोडण्या बंद करण्यासह ४ गाळे व २ मोबाइल टॉवर तसेच मंगल कार्यालये देखील सील केली होती.

लोक अदालतीत हजर राहण्याचे फर्मान
पालिकेने आवाहन करूनही गत ४ वर्षापासून अनेकांनी पाणीपट्टी व मालमत्ता कर न भरल्याचे समोर आले आहे. मात्र, काही थकबाकीदारांना सूचना करूनही मालमत्ता कराची रक्कम जमा करत नसल्यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी शहरातील ६०० थकबाकीदारांकडील ४० लाख रूपयांच्या कर वसुलीसाठी न्यायालयात प्रकरणे दाखल केली आहेत. तर थकबाकीदारांना ७ मे रोजी चाळीसगाव न्यायालयात होणाऱ्या लोक अदालतीत हजर राहण्याचे फर्मान काढले आहे. पालिकेने कर वसुलीसाठी थकबाकीदारांना थेट न्यायालयात खेचल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.

६५ टक्के कर वसुली : यंदा पालिकेला मार्च अखेर घरपट्टीसाठी ९.५० कोटींचे उद्दिष्ट होते. त्यातील ५ कोटी ५० लाख वसूल झाले. पाणीपट्टीच्या ४ कोटींचे ५० लाखांच्या उद्दिष्टांपैकी ३ कोटी वसूल झालेत. एकूण ८ कोटी ५० लाख वसूल झाले असून एकूण ६५ टक्के वसुली झाल्याचे कर निरीक्षक राहुल साळुंखे म्हणाले.

कर भरून पालिकेस सहकार्य करा
चाळीसगाव शहरातील मालमत्ता थकबाकीदारांना पालिकेने अनेक वेळा नोटिस देऊन थकबाकीची रक्कम जमा करण्याची सूचना दिली आहे. परंतु, त्या थकबाकीदारांनी पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्या थकबाकीदारांविरुद्ध चाळीसगाव न्यायालयात होणाऱ्या लोक अदालतीत प्रकरण दाखल केले आहेत. नागरिकांनी कर भरून पालिकेस सहकार्य करावे. - राहूल सांळुखे, कर निरीक्षक

बातम्या आणखी आहेत...