आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावांमध्ये एकोपा:एक गाव-एक गणपतीने 22 गावांमध्ये एकोपा, पारंपरिक वाद्यांना असेल प्राधान्य

चाळीसगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावागावांमध्ये एकोपा रहावा, शांतता नांदावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून तालुक्यात ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवण्यात आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील शहर, ग्रामीण व मेहुणबारे पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल २२ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना साकारली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एक गाव एक गणपती या संकल्पनेस बळ मिळाल्याने पोलिस प्रशासनाच्या प्रयत्नाला यश लाभल्याचे दिसून आले. परिणामी प्रशासनाच्या कामाचा ताण काहीसा हलका झाला आहे.

सध्या तालुक्यात गणेशाेत्सवाच्या निमित्ताने भक्तिमय वातावरण आहे. ग्रामीण भागातील मंडळांनी एकत्र येऊन एकोप्याने गणेशोत्सव साजरा करावा यासाठी पोलिसांकडून ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवण्यात येते. गणेशोत्सवात गावागावातील गट-तट हे पोलिसांसाठी त्रासदायक ठरतात. त्यामुळे सर्वांनी एकत्र मिळून रहावे, पर्यायाने गावात शांतता राहण्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चाेपडे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के.के. पाटील, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी आपल्या हद्दीतील गावागावांमध्ये ही संकल्पना अंमलात आणली.

मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५५ गावे आहेत. यंदा मेहुणबारे पाेलिस ठाणे हद्दीत चार गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना राबवली आहे. तर एकूण २६ सार्वजनिक मंडळे आहेत. डीजेचा आवाज मर्यादेत ठेवावा, गुलालाएेवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करावा, असे आवाहन सहाय्यक पाेलिस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी मंडळांना केले आहे.

या गावांमध्ये एक गणपती : हातगाव, माळशेवगे, गणपूर तांडा, शिंदी, जामडी, विसापूर, आंबेहाेळ, लोंजे, हातले, बेलदारवाडी, शिवापूर रोकडे तांडा, तरवाडे, चितेगाव, रोहिणी, वाघले, नांद्रा, जामदा, दरेगाव, टेकवाडे.

संकल्पनेचे महत्त्व सांगितले समजावून
या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेवून शांतता समिती, गणेश मंडळे व ग्रामस्थांच्या बैठका घेतल्या. त्यांना या संकल्पनेचे महत्त्व व फायदे समजावून सांगितले. या उत्सवा दरम्यान मंडळांना शासनाने घालून दिलेल्या नियमांबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. सूचनांचे व नियमांचे पालन करून शांततेत गणेशाेत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.

ग्रामीण पाेलिस ठाणे हद्दीत १८ गावांत यश
ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण ७७ गावे आहेत. गेल्यावर्षी ४० सार्वजनिक मंडळे हाेती. एक गाव एक गणपतीसाठी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, गाेपनीयचे पाेलिस हवालदार भागवत पाटील, कैलास पाटील, संदीप पाटील, शांताराम पवार यांनी पुढाकार घेतला. गावोगाव जावून जनजागृती केली. एकूण १८ गावांमध्ये संकल्पना राबवली.एकूण ३१ गावांमध्ये ५२ मंडळांनी परवानगी घेतली. ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३४ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत.

बातम्या आणखी आहेत...