आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई:एक गाव, सहा भाव; चाळीसगाव शहरात सहा पेट्रोल पंपांवर इंधनाचे दर वेगवेगळे, वाहतूक खर्चामुळे इंधनाच्या दरात तफावत-पेट्रोलपंप चालक, वाहनधारकांना बसतोय वाढीव आर्थिक फटका

चाळीसगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले असून महागाईचा भडका उडाला आहे. इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. चाळीसगाव शहरात भडगावरोड भागात तीन, धुळेरोड भागात दोन, हिरापूर रस्ता आणि मोठ्या पुलाखाली प्रत्येकी एक असे सात पेट्रोल पंप आहेत. सहाही पंपांवर पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे आहेत. प्रत्येक पंपावरील पेट्रोल, डिझेलच्या दरात काही पैशांची तफावत असल्याचे ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणी समोर आले. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांना खिसा रिकामा करावा लागत आहे.

हे आहे कारण
या वेगवेगळ्या दरांमागील कारण विचारले असता तेथील पंप चालकांनी सांगितले की, ट्रान्सफोर्ट खर्च यामागे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. पेट्रोल, डिझेलची वाहतूक जेवढी जास्त अंतरावरून होते, तेवढा ट्रान्सपोर्टचा खर्च अधिक असतो. चाळीसगावात पेट्रोल, डिझेल हे मनमाड, पानेवाडी, शिरूड या डेपोमधून येते. त्यामुळे वाहतूक खर्चाच्या अनुरूप इंधनाचे दर ठरतात, असे पंपचालक म्हणाले.

ग्राहकांचा उडतो गोंधळ
शहरातील सातही पेट्रोल पंपावर इंधनाच्या दरात तफावत असल्याने वाहनधारकांचा गोंधळ उडतो. काही ग्राहक पंपावरील कर्मचाऱ्यांसोबत वादही घालतात. पेट्रोलपंप चालकांनी पेट्रोल, डिझेलचे एकच भाव ठेवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने लक्ष घातले पाहिजे, अशी अपेक्षा चाळीसगावकरांची आहे.

दराचे आंतरराष्ट्रीय गणित
भारताला रोज जवळपास ४० लाख बॅरल कच्चे तेल लागते. यापैकी देशात दहा लाख बॅरेल्सचे उत्पादन होते, तर उरलेली मागणी पूर्ण करण्यासाठी भारताला परदेशातून कच्चे तेल मागवावे लागते. ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे द्यावी लागते. हे दर पुरवठा आणि मागणी यावर ठरतात. अर्थात पुरवठा किती करायचा याचा निर्णय तेल उत्पादक देश घेतात. पुरवठा कमी केला की, कच्च्या तेलाच्या किमती वाढणार हे साधे गणित असते, असेही शहरातील पंप चालकांनी सांगितले.

का वाढतात इंधनाच्या किंमती?
आंतरराष्ट्रीय बाजारात तेल निर्यातदार देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा कमी होऊन इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्च्या तेलाच्या किमती ५५ ते ६० डॉलर प्रती बॅरलवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे इंधनाचे दरही वाढले आहेत.

बातम्या आणखी आहेत...