आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनास्था:पैसे मोजूनही 15 हजार लाभार्थ्यांना अर्धवट शिधा; दिवाळीनंतरही चाळीसगावात प्रतीक्षा कायम

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकार दिवाळीपूर्वी कार्डधारकांना १०० रूपयात प्रत्येकी एक किलो रवा, साखर, चनाडाळ व तेल असे चार वस्तूंचे किट देणार होते. त्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील ६१ हजार ११३ कार्डधारक पात्र होते. मात्र, दिवाळी संपून आठवडा उलटला तरीही १५ हजार लाभार्थींना पूर्ण किट मिळाले नाही. काहींना अर्धवट किट मिळाले. कार्डधारकांकडून किटसाठी १०० रुपये घेऊनही त्यांना अर्धवट शिधा देण्यात आला आहे.

ठेकेदाराने माल न पुरवल्यामुळे कार्डधारकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.तहसील कार्यालयाने चाळीसगाव शहर आणि तालुक्यातील कार्डधारकांसाठी ६१ हजार ११३ किटची मागणी केली होती. या किटच्या माध्यमातून १०० रुपयांत चार वस्तू मिळणार असल्याने दिवाळी गोड होईल अशी कार्ड धारकांची अपेक्षा होती. मात्र उपरोक्त मागणीनुसार साहित्य न मिळाल्याने लाभार्थ्यांची दिवाळी गोड झालीच नाही.

कष्टकरी राहणार वंचित?
चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागात बंजारा समाजबांधवांची संख्या मोठी आहे. हे बांधव दरवर्षी ऊसतोडीसाठी राज्याच्या अन्य भागात जातात. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झालेला आहे. अशा परिस्थितीत बहुतांश कष्टकरी बंजारा आणि अन्य ऊसतोड कामगारांच्या घरांना सध्या कुलूप आहे. त्यांच्यापर्यंत आनंदाचा शिधा कसा पोहोचेल?, त्याचा काळाबाजार तर होणार नाही ना? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

किटची मागणी नोंदवली
लाभार्थ्यांना रेशन किटमधील वस्तूंचे वाटप झाले असून अद्याप काही कार्डधारकांना किट मिळाल्या नाहीत. त्याबाबत जिल्हास्तरावर मागणी करण्यात आली आहे. किट प्राप्त झाल्यावर लागलीच कार्डधारकांना वाटप केले जाईल. -राजेंद्र ढोले, पुरवठा अधिकारी, चाळीसगाव

बातम्या आणखी आहेत...