आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:दुचाकी हळू चालवण्यास सांगणाऱ्या पोलिसांना मारहाण ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

चाळीसगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गर्दीचे ठिकाण आहे, दुचाकी हळू चालव, असे सांगण्यास गेलेल्या शहर वाहतूक शाखेच्या दोघा पोलिस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून शिवीगाळ करत सैन्य दलातील जवानाने मारहाण केल्याची घटना शहर पोलिस ठाण्यासमोरील आर्यापहार चौकात मंगळवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ओढरे (शिदी) येथील भूषण दिलीप जाधव असे अटक केलेल्या जवानाचे नाव आहे. दरम्यान, चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे पोलिस नाईक नरेंद्र पाटील हे १४ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यासमोरील आर्यापहार चौकात कर्तव्य बजावत होते. या वेळी भूषण जाधव हा दुचाकी (एमएच- १९, बीआर- १७२९) वेगाने चालवत असल्याने पोलिस नाईक नरेंद्र पाटील यांनी त्यास थांबवून गर्दीचे ठिकाण आहे, दुचाकी हळू चालव, असे सांगितले. या वेळी हुज्जत घालत दुचाकीवरुन खाली उतरून नरेंद्र पाटील यांना शिवीगाळ करून भूषण जाधव यांनी गणवेशाची शर्टाची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. तसेच गणवेश फाडून टाकला. या वेळी तेथे कर्तव्यास असलेले पोलिस नाईक प्रशांत पाटील हे भूषण जाधव यास समजावण्यास गेले असता त्यांनाही त्याने शिवीगाळ करून कानशिलात लगावली. याप्रकरणी प्रशांत पाटील यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात भूषण जाधव याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहर पोलिसांनी भूषण जाधव याला अटक केली असून त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तपास सपोनि सचिन कापडणीस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...