आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातीन तालुक्यात विस्तार असलेल्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. संस्थेच्या २०२२-२७साठी होणाऱ्या निवडणुकीसाठी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी संस्थेच्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात २१ ते ३० जून दरम्यान हरकतींचा कार्यक्रम असून १५ जुलै रोजी अंतीम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत होण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळाची गेल्या वर्षीच मुदत संपली आहे. मात्र, कोरोनामुळे ही निवडणूक पुढे ढकलली होती. सध्या विद्यमान संचालक मंडळच संस्थेचा कारभार पाहत आहेत. चाळीसगाव, भडगाव व पाचोरा अशा तीन तालुक्यात संस्थेचा विस्तार असून सर्वात मोठी शैक्षणिक संस्था म्हणून या संस्थेचा नावलौकिक आहे. या संस्थेचे २४ हायस्कूल, १ सिनिअर कॉलेज, ५ ज्युनिअर कॉलेज, २ आश्रमशाळा, १ मुलींचे वसतिगृह, ३ मुलांचे वसतिगृह व १ अंधशाळा अशा शाखा आहेत. या संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे संस्थेवर संचालक म्हणून निवडून येण्यासाठी मातब्बरांमध्ये रस्सीखेच असते.
असा आहे कार्यक्रम २१ रोजी जाहीर झालेल्या प्राथमिक यादीनुसार संस्थेचे ३ हजार ३४३ इतकी सभासद संख्या असून हे सभासद संस्थेचे १९ संचालकांना निवडून देणार आहेत. सभासदांची तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर या मतदार यादीवर ३० जूनपर्यंत हरकती व आक्षेप घेता येतील. हरकतींवर ११ जुलै रोजी अंतीम सुनावणी झाल्यानंतर मतदारांची अंतीम यादी १५ जुलै रोजी प्रसिद्ध होईल.
तीन तालुक्यात उत्सुकता ... मतदार यादी प्रसिद्धीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे इच्छुकांच्या देखील हालचाली वाढणार आहेत. काही दिवसांपूर्वी विरोधी संचालकांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर संस्थेची आगामी निवडणूक चांगलीच गाजण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे निवडणुकीची चाळीसगावसह भडगाव व पाचोरा तालुक्यातील येथील सर्वांनाच उत्सुकता लागून आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.