आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशोत्सव:पहिल्या दिवशी रडूबाई,शिक्षकांकडून सरबराई ; औक्षण करून, रांगोळी काढून, वाजत गाजत विद्यार्थ्यांचे केले स्वागत

चाळीसगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमधील नाते दुरावले होते. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना आपल्या वर्गशिक्षकांची माहिती नव्हती. पहिली, दुसरीतील अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा चेहराही पहिला नसल्याने, प्रत्यक्ष वर्गात जाताना त्यांच्या मनात भीती होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी पालकांसोबत शाळेत आले, मात्र लागलीच घरी परत गेले. तर काही विद्यार्थी वर्गात रडत बसले होते. रडणाऱ्या विद्यार्थ्यांची समजूत काढण्यात शिक्षकांचा बराचसा वेळ गेला. चॉकलेट, बिस्कीटचा खाऊ मिळताच विद्यार्थ्यांचे चेहरे पुन्हा खुलले. शहरासह तालुक्यात विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत झाले, त्यांना नवीकोरी पुस्तकेही मिळाली, मात्र चाळीसगाव तालुक्यातील २० हजार विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश न मिळाल्याने विद्यार्थी हिरमुसले होते. विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा आहे. विद्यार्थ्यांचे फेटे बांधून स्वागत, पालकदेखील भारावले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना फेटे बांधून त्यांचे वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आल्याने, विद्यार्थ्यांसोबत आलेले त्यांचे पालकही भारावून गेले. शाळेचा पहिला दिवस गोड व्हावा म्हणून विद्यार्थ्यांना पेढे, चॉकलेट देऊन खुश करण्यात आले. शिक्षकांमध्ये उत्साह गेले दीड वर्ष मुलांचे शाळाविश्व ठप्प झाले होते. शाळा ऑनलाइन सुरू असल्या तरी या रोजच्या दिनक्रमापासून, शाळेच्या उत्साही वातावरणापासून, मित्रमैत्रिणी, शिक्षक यांच्यापासून विद्यार्थी दुरावले होते. परंतु, आता दररोज मित्र मैत्रिणींची शाळेत भेट होणार आहे. शिक्षकांनाही गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांची प्रतीक्षा होती. पहिलीतील विद्यार्थी तिसरीत जून २०२० च्या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या वर्गात असणारा विद्यार्थी आता २०२२-२३ या नवीन शैक्षणिक वर्षात तिसरीच्या वर्गात जाईल. दोन वर्षांत केवळ सहा महिने या विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले. त्यामुळे बाराखडी, उजळणी, काना-मात्रांच्या शब्दांची ओळख विद्यार्थ्यांना पूर्णपणे झालेली नाही. त्यामुळे शिक्षकांची डोकेदुखी वाढणार आहे. १५ दिवसांत मिळेल गणवेश पहिल्या दिवशी शाळेत गणवेश मिळतो म्हणून विद्यार्थी बऱ्यापैकी हजर असतात. मात्र यंदा गणवेशाच्या निधीला तांत्रिक अडचण निर्माण झाली त्यामुळे वेळेत निधी प्राप्त झाला नसल्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आला नाही. येत्या १५ दिवसात विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाईल असे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पहिल्या दिवशी ५० टक्के उपस्थिती... ऑनलाइन शिक्षणाला विद्यार्थी व पालक कंटाळले होते. मात्र आता नियमित शाळा सुरू होत असल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची वर्गात ५० टक्के उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या स्वागताला गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, गटशिक्षणाधिकारी विलास भोई, ग्रामीण भागात सरपंच, शाळा समिती अध्यक्ष, चेअरमन यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक यावेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...