आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरालगत करगाव रस्त्यावर असलेल्या रुबाबदार हॉटेलच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर डीआयजींच्या नाशिक विभागाच्या पथकाने छापा टाकून सुमारे १ लाख ३३ हजार रुपयांच्या रोकडसह ११ मोबाइल, ११ मोटारसायकली व ५२ पत्यांचा कॅट असा एकूण सुमारे ३ लाख ७१ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या छाप्यात १२ जुगारी पोलिसांच्या हाती लागले आहेत तर ६ जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. शुक्रवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
विशेष पोलिस महानिरीक्षकांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी पथके नेमली आहेत. या पथकांपैकी पोलिस निरीक्षक बापू रोहोम, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जाधव, सहाय्यक फौजदार बशीर तडवी, हवालदार रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, शेख शकील अहमद, पोना मनोज दुसाणे, प्रमोद मंडलिक, कुणाल मराठे, सुरेश टोंगारे यांचे एक पथक विशेष महानिरीक्षकांच्या आदेशाप्रमाणे चाळीसगाव भागात पेट्रोलिंग करत होते. पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांना गुप्त माहिती मिळाली की, चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत करगाव रोडलगत रुबाबदार हॉटेलच्या पाठीमागे दिव्याच्या प्रकाशात मोकळ्या जागेत जुगार खेळला जात आहे.
पहाटे जुगार अड्ड्यावर छापा
पोलिसांनी माहितीची खात्री करून पहाटे १ वाजता करगाव रोडवरील ते ठिकाण गाठले. वाहने काही अंतरावर उभी करून तेथून जुगार खेळला जात असलेल्या ठिकाणी पथक पायी गेले. तेथे काही जण जुगार खेळत असल्याचे दिसले. पोलिसांनी तेथे छापा मारला असता १२ जण हाती लागले तर काही जण मोकळ्या पटांगणाचा फायदा घेत शेतातून पसार झाले. पकडलेल्या जुगारींची अंगझडती घेतली. त्यांच्याकडे १ लाख ३३ हजार ६२० रुपयांची रोकड मिळाली. तसेच १२ हजार ५०० रुपये किमतीचे ११ मोबाइल, २ लाख २५ हजार रुपये किमतीच्या ११ मोटारसायकली असा सुमारे ३ लाख ७१ हजार १२० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. या सर्व १८ जणांविरोधात पथकातील हवालदार सचिन धारणकर यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.