आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक परिचारिका दिन विशेष:शेंदुर्णीच्या राजश्री पाटलांनी कोरोना काळात केल्या 400 हून अधिक प्रसूती, 18 हजार नागरिकांचे लसीकरणही केले पूर्ण; वेगवेगळ्या कामांसाठी अनेकवेळा मिळाला प्रथम पुरस्कार

शेंदुर्णी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य अंगीकारलेल्या राजश्री पाटील यांच्या कार्याची शासनाने दखल घेत त्यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड केली आहे. कोरोना काळात चारशेहून अधिक सुखरूप प्रसूती करणाऱ्या शेंदुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहायिकाचे काम करणाऱ्या राजश्री पाटील यांना आदर्श परिचारिका म्हणून राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार दिला जाणार आहे.

कोरोना काळात प्रसूतीसाठी काही रुग्णालयात रुग्णांना घेत नसताना राजश्री पाटील यांनी अजिंठ्याच्या डोंगर, दऱ्यातून, वस्ती, पाड्यातून आलेल्या प्रत्येक गरोदर महिलांना मानसिक आधार दिला. तसेच कोरोनाची भीती मनात न ठेवता तब्बल ४०० हून अधिक महिलांची शेंदुर्णीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुखरूप प्रसूती केली. गरोदर महिलांच्या कुटुंबातील सदस्य कोरोनाने बाधित असतानाही त्यांनी महिलांच्या सुखरूप प्रसूती केल्या आहेत. तर सन २०१३- १४पासून त्यांच्या नावावर आजपर्यंत १ हजाराहून अधिक सुखरूप प्रसूती करण्याचा रेकॉर्ड आहे.

दरम्यान, शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आतापर्यंत ५६ हजाराहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. त्यात राजश्री पाटील यांच्या एकट्याच्या नावावर १८ हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचा बहुमान आहे. कुटुंब कल्याण, लहान बालकांचे लसीकरण, आशा स्वयंसेविकांसोबत जनजागृती यात आरोग्य सहायिका राजश्री पाटील नेहमी पुढे असतात. यामुळेच त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

मनापासून सेवा केल्याने ध्येय गाठणे सोपे : राजश्री पाटील म्हणाल्या की, प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवा देताना मर्यादा येतात. मात्र, येणाऱ्या रुग्णाचा जीव वाचलाच पाहिजे म्हणून मनापासून सेवा करत असल्याने ध्येय गाठणे सोपे होते. राजश्री पाटील यांचे सासर जामनेर तालुक्यातील भिलखेडा येथील असून पहूरचे माहेर आहे. त्यांचे पती शेतकरी असून त्यांना एक मुलगी आहे. जवळपास ८ वर्षापासून त्या शेंदुर्णीत सेवा देत असून मुख्यालयातच २४ तास राहतात.

बातम्या आणखी आहेत...