आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैकुंठ चतुर्दशीला साजरा:बालाजी महाराजांचा आज रथाेत्सव; पाचोऱ्यातील 189 वर्षांची परंपरा

पाचोरा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा येथील जवळपास १८९ वर्षाची परंपरा असणारा बालाजी महाराजांचा रथयात्रा उत्सव कार्तिक शुद्ध चतुर्दशी म्हणजे वैकुंठ चतुर्दशीला साजरा केला जाताे. या वर्षी ७ नोव्हेंबर रोजी रथयात्रा आयोजित केला आहे.रथात बालाजी महाराजांची मूर्ती बसवून ढोल-ताशे, लेझीम यांच्या गजरात रथ गल्ली, विठ्ठल मंदिर रोड, तलाठी कार्यालय, जामनेर रोड, महात्मा गांधी रोड व परत रथ गल्ली अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता सुरु झालेली रथ मिरवणूक रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहते. दोर बांधून लोकसमुहाद्वारे बालाजी महाराज की जयच्या निनादात बालाजी महाराजांचा रथ ओढला जातो.

मिरवणुकीत शहरासह पंचक्रोशीतील हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेतात. या उत्सवानिमित्त गांधी चौक, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागात यात्रा भरते. बालाजी महारांजाना प्रसाद म्हणून केळी व नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. रथ मार्गात भाविक रथाची पूजा करतात. बालाजी महाराजांचा रथ पाचोरा, पारोळा व नगरदेवळा येथील कुशल कारागिरांनी सागवानी लाकडापासून तयार केला असून ३० फुट उंचीचा हा रथ आहे. रथावर सुंदर कोरीव नक्षीकाम केले आहे. रथ थांबवणे, वळवणे यासाठी लाकडी मोगरीचा उपयोग केला जातो. मोगरी लावण्याचे जोखमीचे काम अशोक वाडेकर व सुभाष सोनवणे व त्यांचे सर्व कुटुंबीय पार पाडतात. रथापुढील मशालींचे काम परशुराम अहिरे व नितीन शिरसाठ यांना दिले आहे. सयाजी पाटील परिवार व मित्र परिवार तसेच शहरातील सर्व भक्त रथयात्रेस सहकार्य करतात.

यांच्या हस्ते हाेईल पूजा रथाच्या पूजेचा मान पाटील परिवारातील नवविवाहित जोडप्यास असतो. यावर्षी अल्पेश पाटील व प्रणाली पाटील यांच्या हस्ते रथाची पूजा केली जाईल. धार्मिक विधी व दैनंदिन पूजेचा मान प्रमोद जोशी यांच्याकडे आहे. स्वर्गीय राघो गणपत पाटील यांच्या घराण्यास चोपदाराचा मान आहे. हल्ली त्यांचे नातु प्रा. गिरीश पाटील हे चोपदाराचे काम पाहतात.

बातम्या आणखी आहेत...