आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययाेजनेची गरज:चाळीसगावात अपघाताची मालिका; वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व तालुका परिसरात अपघाताची मालिका सुरूच आहे. रविवारी दुपारी शहरातील धुळेराेड उड्डाण पुलावर झालेल्या अपघातात बिलाखेड येथील ३२ तरुण ट्रकच्या धडकेेत चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत चाळीसगाव ते मालेगाव रस्त्यावरील बिलाखेड गावाजवळच रात्री दुचाकीवरून जाणाऱ्या ५४ वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वे उड्डाणपुलावरून रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बिलाखेड येथील विश्वनाथ विजय वाघ (वय ३२) हे दुचाकी (एमएच- १९, बीसी- ८१४२) ने चाळीसगावकडून बिलाखेड-कडे जात हाेते. रेल्वे उड्डाण पुलावर धुळ्या कडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक (एमएच- १८, बीजी- १७९२)ने वाघ यांच्या दुचाकीस जबर धडक दिली.

या अपघातात विश्वनाथ वाघ हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकचालक शाम सुरेश सोळसे (रा. राममंदिर जवळ, ब्राम्हणे, ता. शिंदखेडा, जि. धुळे) हा जमलेली गर्दी पाहून ट्रक सोडून पळून गेला. याप्रकरणी अनिल दादाभाऊ पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात ट्रकचालक शाम सोळसे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.

उड्डाण पूल ठरताेय धाेकादायक
अत्यंत वर्दळीचा असलेला रेल्वे उड्डाणपुल काही दिवसांपासून अपघातग्रस्त पूल बनला आहे. या पूलावर नेहमी अपघात होत असून जीवित व वित्त हानीच्या घटना घडत आहेत. या उड्डाणपुलाची अलीकडेच दोन्ही बाजूंच्या लोखंडी कठड्यांची डागडुजी केली तरी काही ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. हे खड्डे वाचवताना बऱ्याच वेळा वाहनधारकांचे नियंत्रण सुटते. तसेच साईडपट्ट्याही असून नसल्यासारख्या आहेत. त्यामुळे उड्डाण पुलावर सतत अपघात हाेत असतात.

अपघातात सायगावच्या प्राैढाचा मृत्यू
दुसऱ्या घटनेत सायगाव येथील विवेक विश्वराव सोनवणे- पाटील (वय ५४) हे रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून घरी सायगावकडे जात हाेते. बिलाखेड जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मृत अवस्थेत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीवरून चाळीसगाव शहर पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...