आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर:विद्यार्थ्यांनो, आवड अन् क्षमतेनुसार करिअर निवडा; यश मिळवून शाळेचा नावलौकिक करा : प्रा.चिंचोले

पाचोरा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीनंतर आपल्या क्षमतेनुसार व आवडीनुसार करिअर निवडून त्यात यशाचा टप्पा गाठावा. तसेच स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करून शाळेचे व परिसराचे नाव उज्वल करावे, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी येथे केले. शहरातील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शुक्रवारी आयोजित स्पर्धा परीक्षा अन् करिअर या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रेम शामनाणी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमिना बोहरा यांनी केले. गुरुकुल, बुऱ्हानी व इतर शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रा.चिंचोले यांनी ‘इयत्ता दहावी व बारावीनंतर करिअरच्या विविध संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. जेईई, नीट, इंजिनिअरिंग सीईटी, फार्मसी सीईटी, हॉटेल मॅनेजमेंट, वाणिज्य शाखेतील करिअरच्या विविध संधी यावर त्यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन कमिशन यासारख्या विविध स्पर्धा परीक्षांविषयी देखील त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रेम शामनाणी यांनी विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीसाठी व स्पर्धा परीक्षेतील यशासाठी विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच शाळेत नुकत्याच सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षा वाचनालय व ई लायब्ररीच्या माध्यमातून शालेय अभ्यासक्रमातील संकल्पनांसोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

तर कोणत्याही क्षेत्रात करिअर करताना आपली क्षमता व आवड ओळखून यशाचे शिखर गाठा, अशा शुभेच्छा प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी दिल्या. सूत्रसंचालन सोनार यांनी केले तर आभार आमेना बोहरा यांनी मानले. या कार्यक्रमास पालक, शिक्षक व शाळेतील आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निखिल शामनानी, अंकुश शामनानी, दुर्गेश शेलार व सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...