आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवरमुळे दक्षता:अमळनेरात 10 हजार बालकांचे सर्वेक्षण पूर्ण, एक संशयित रुग्ण

अमळनेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवर आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरात गेल्या १२ दिवसांपासून पालिका रुग्णालयामार्फत घरोघरी बालकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १० हजार ४६१ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात गोवरची लस न घेतलेल्या ११२ बालकांना पथकांनी लसीकरण केले आहे. सर्वेक्षणात एका बालकाला गोवरची लक्षणे आढळली आहेत. या बालकाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

शहरात पालिका रुग्णालयामार्फत एक वैद्यकीय अधिकारी, १० आरोग्य सेविका व ३४ आशा सेविकांमार्फत, २ ते १० डिसेंबर या काळात पहिल्या टप्प्यात सर्वेक्षण करण्यात आले. या मोहिमेत शहरात घरोघरी जाऊन ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील १० हजार ४६१ बालकांचे आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले. काही बालकांना व्हिटॅमिन ‘अ’ चे लसीकरण केले. तर मुदत उलटूनही ज्या बालकांनी गोवर लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतलेला नव्हता, अशा ११२ बालकांना गोवरचे लसीकरण केले. दुसऱ्या टप्प्यात १५ ते २५ डिसेंबर या काळात पुन्हा सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. त्यात आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन बालकांची तपासणी करतील. तसेच गोवरची लक्षणे आढळणाऱ्या बालकांवर उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे पथकांना योग्य माहिती द्यावी.

खासगी रुग्णालयांवरही लक्ष शहरातील सर्व बालरोग तज्ज्ञांना गोवरच्या आजाराबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या पथकामार्फत खासगी रुग्णालयांमधूनही बालरुग्णांची माहिती संकलित केली जात आहे. गोवरची लक्षणे आढळणाऱ्या बालकांची माहिती आरोग्य विभागाला कळवण्याचे निर्देश खासगी रुग्णालयांना दिले आहेत.

अशी घ्यावी काळजी बालकांचे लसीकरण वेळेवर करावे, लक्षणे आढळल्यास बालकांना शाळेत पाठवू नये, रुग्णाच्या संपर्कात जाणे टाळावे, दिवसभरात जास्तीत जास्त वेळा हात साबणाने धुवावे, मास्क वापरावा, हात, चेहरा, डोळे, तोंडाला स्पर्श करू नये.

सुरतहून आलेला बालक संशयित शहरात चार दिवसांपुर्वी सुरतहून आलेल्या ११ महिन्यांच्या बालकाला गोवरची लक्षणे आढळली. त्याला ताप, सर्दी, खोकला, अंगावर पुरळ अशी लक्षणे आढळली होती. या बालकाच्या रक्ताचे नमुने जळगाव येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून संशयित रुग्णाच्या आजूबाजूला असलेल्या २५० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच त्याठिकाणी आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...