आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण वाढण्यास वाव:अमळनेरात फेरीवाला धोरण अद्याप रखडले

अमळनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेरात फेरीवाला धोरण कागदावरच असून विक्रेत्यांना याबाबत नियम माहिती नाहीत. तसेच या धोरणाची माहिती नाही, त्यामुळे झोन निर्मितीही रखडली आहे. या सर्व बाबींमुळे अतिक्रमण वाढण्यास वाव मिळत असून बेशिस्त वागणूक वाढली आहे.

अमळनेर शहरात फेरीवाला धोरण राबवून त्याची अंमलबजावणी केल्यास शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न सुटला असता. याबाबत माजी आमदार साहेबराव पाटील आग्रही होते. त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करुन याबाबत धोरण आखण्यास भाग पाडले होते. मात्र, ते धोरण पुढे गायबच झाले. आता मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनीच पुढाकार घेऊन हे धाेरण आखावे, अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, अमळनेर शहरासह ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने बाजारासाठी येत असल्याने माेठी बाजारपेठेत माेठ्या प्रमाणात गर्दी हाेते. त्यामुळे कोंबडी बाजार, लालबाग पाण्याची टाकी, महेश गेस्ट हाउस-पर्यंतची गल्ली, विजय शॉपी ते जुने ग. स. पतपेढी-पर्यंतची गल्लीत माेठी गर्दी असते. या दोन्ही गल्ल्यांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा आणि मध्यभागी दुकाने थाटलेली असतात. याच मार्गाचा नागरिक शाॅर्टकट रस्ता म्हणून उपयोग करतात.

तर काही वाहनचालक ही याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे बाजारात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना ये-जा करता येत नाही. त्यामुळे सोमवारी या मार्गावरील वाहतूक वळवावी अन्यथा बाजाराच्या मार्गावर बॅरिकेड्स उभारावे, जेणे करून मोठी वाहने बाजारात प्रवेश करणार नाहीत. तर दिवसा नो-एन्ट्री झोन करण्याची गरज आहे.

जळगाव येथील कामगार आयुक्तांना दिले आहे पत्र
फेरीवाला धोरणासंदर्भात ऑनलाइन यादी तयार केली असून १ हजार २५४ विक्रेत्यांची नोंदी झाली आहे. मुख्याधिकारी अध्यक्ष असलेल्या पथविक्रेता समिती निवड करण्यासाठी जळगाव येथील कामगार आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यांनी निवडणुकीचे पत्र दिल्यानंतर निवड होईल.- प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी

अशी वळवावी वाहतूक: कोंबडी बाजारातली वाहतूक कारंज्या चौकाकडून सुभाष चौक मार्गे वळवता येईल. तसेच बँक ऑफ बडोदाकडील वाहतूक पोस्ट ऑफिस मार्गे सरळ बस स्थानकाकडे वळवता येईल. तर महेश गेस्ट हाऊसकडील वाहतूक स्टेशन रोड मार्गे सुभाष चौक किंवा स्टेट बँकेकडे वळवता येईल.

बातम्या आणखी आहेत...