आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र परिवहन महामंडळ चांगल्या सुविधा देत प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी बसमध्ये बसण्याचे आवाहन करते. परंतु २० रुपये भाडे कमी असल्यामुळे कर्मचारी प्रवाशांशी कसे गैरवर्तन करतात, हे एका घडलेल्या घटनेवरून दिसून आले आहे. प्रवासासाठी २० रुपये कमी भरल्याने एका कुटुंबातील तीन सदस्यांना रात्रीच्या अंधारात बस खाली उतरवून सोडून दिल्याची घटना घडली. या संदर्भात पीडित कुटुंबाच्या नातेवाइकांनी अमळनेरचे आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांच्याकडे लेखी तक्रार करून संबंधित कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. धुळे येथील रहिवासी साबीर शेख आणि त्यांची पत्नी रोजिना त्यांच्या ५ वर्षाच्या मुलासह अमळनेर बस स्थानकावरून धुळे डेपोच्या बस (क्रमांक ३७४६) मध्ये २८ रोजी रात्री ९ वाजता बसले. तिकीट काढण्याची वेळ आली तेव्हा शेख यांच्याकडे भाड्यासाठी पुरेसे पैसे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावर शेख यांनी वाहकाला ऑनलाइन भाडे घेण्यास सांगितले.
त्याला नकार देण्यात आला. संबंधित वाहक सहमत नसताना शेख यांनी तिकीट देऊन उर्वरित २० रुपये भाडे धुळे बसस्थानकावर भरेल, असे वाहकाला सांगितले. परंतु, बस वाहकाने त्यांचे म्हणणे न ऐकून घेता अमळनेर शहरापासून काही अंतरावर रात्री ९ वाजता सर्व कुटुंबीयांना खाली उतरवून दिले. त्यानंतर शेख यांनी नातेवाइकाला फोन करून हा प्रकार सांगितला. दरम्यान, याबाबत शेख यांच्या नातेवाइकाने अमळनेरचे आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांच्याकडे बसच्या वाहका (बिल्ला क्रमांक ३७७३) विरुद्ध तक्रार करून कठोर कारवाईची विनंती केली. तर तत्काळ कारवाई न केल्यास वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.